Published On : Mon, Jul 12th, 2021

मनपा इंग्रजी माध्यमाच्या सहा शाळा सुरू : महापौर दयाशंकर तिवारी

मनपा आणि आकांक्षा फाऊंडेशनमध्ये सामंजस्य करार : केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीचे वर्ग लवकरच होणार सुरू

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमुलाग्र परिवर्तन ठरणारा महत्वाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सहा इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे. आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने नागपूर शहरामधील झोपडपट्टी भागामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत असून यासंदर्भात मनपा आणि यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे. या नव्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये लवकरच नि:शुल्क केजी वन, केजी टू आणि इयत्ता पहिलीच्या वर्गांना सुरूवात होणार आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisement

पत्रकार परिषदेमध्ये उपमहापौर मनीषा धावडे, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे, उपसभापती सुमेधा देशपांडे उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर शहरातील सहा विधानसभा क्षेत्रामध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मनपा सभागृहामध्ये ठेवण्यात आला होता. काही प्रशासकीय अडचणींमुळे गतवर्षी तो मंजुर होउ शकला नाही. यावर्षी यामधील सर्व बारकावे लक्षात घेउन येणारे अडथळे दूर करण्यात आले व सभागृहाद्वारे पारीत ठरावाला आयुक्तांमार्फत मंजुरी देण्यात आली. उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती प्राथमिक शाळा, पूर्व नागपुरातील बाभुळबन मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण-पश्चिम नागपुरातील स्व.बाबुराव बोबडे मराठी प्राथमिक शाळा, पश्चिम नागपुरातील रामनगर मराठी प्राथमिक शाळा, दक्षिण नागपुरातील रामभाऊ म्हाळगीनगर मराठी प्राथमिक शाळा आणि मध्य नागपुरातील स्व.गोपालराव मोटघरे (खदान) हिंदी उच्च प्राथमिक शाळा या मनपाच्या बंद पडलेल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू होणार आहेत.

नागपूर शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना नि:शुल्क इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे, पुढे त्यातून ते आपल्या स्वप्नांना बळ देउ शकतील, या उद्देशाने या इंग्रजी शाळांची संकल्पना ठेवण्यात आली होती. त्यानुसार शहरातील झोपडपट्टी भागातील मनपाच्या बंद शाळा शोधून त्यामध्ये आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत आहेत. मनपाच्या या पुढाकारामुळे शहरातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल, असेही महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले. इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाल्या म्हणजे मराठी, हिंदी किंवा उर्दू माध्यमांच्या शाळा बंद होतील असे गृहीत धरु नये. मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या शाळांना अद्ययावत करण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थानी पुढे यावे, असे आवाहनही महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

या सहाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये महाराष्ट्र शैक्षणिक मंडळाच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले जाईल. शाळेच्या संचालनाची जबाबदारी आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेला देण्यात आलेली आहे. या संस्थेद्वारे पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नवी मुंबई या चार महानगरपालिकांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे संचालन केले जात आहे. या संस्थेच्या कार्याची चारही मनपातील शाळांना भेट देउन नागपूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे पाहणी करण्यात आली. या संस्थेद्वारे शालेय प्रशासन व व्यवस्थापन, शाळांमध्ये नियुक्त करावयाचे शिक्षक, शाळेचा दर्जा आदी बाबींची पूर्तता केली जाईल. मनपातर्फे इमारत, दुरूस्ती, विद्युत व्यवस्था, पाणीव्यवस्था, गणवेश, पाठ्यपुस्तके, शालेय पोषण आहार, विद्यार्थ्यांना नि:शुल्क बस पास याची जबाबदारी पार पाडली जाईल, अशी माहिती यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.दिलीप दिवे यांनी दिली.

मनपाच्या सहाही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी संस्थेद्वारे नवीन इंग्रजी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन दिले जाईल. शिक्षकांच्या वेतनाचा भार नागपूर महानगरपालिका आणि आकांक्षा फाऊंडेशनद्वारे उचलला जाणार आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी पहिल्या वर्षी संस्थेद्वारे ३० टक्के तर मनपाद्वारे ७० टक्के, दुस-या वर्षी संस्था ३५ टक्के व मनपा ६५ टक्के, तिस-या वर्षी संस्था ४० व मनपा ६०, चवथ्या वर्षी व त्यापुढे संस्था ४५ टक्के तर मनपा ५५ टक्के भार निर्वहन करणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे बहुतांशी गरीब, गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळेल. शिवाय या प्रकल्पाचे यश लक्षात घेउन पुढील शाळांच्या संदर्भातही निर्णय घेण्यात येईल, असेही शिक्षण समिती सभापतींनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement