Published On : Sat, Mar 10th, 2018

रस्ते निर्मिती व गृहबांधणीसाठी कमी खर्चिक असणा-या सामग्रीच्या वापरासाठी पुढाकार घेणे आवश्यक – नितीन गडकरी

Advertisement


नागपुर: रस्ते बांधणी, गृहबांधणी प्रकल्पांमध्ये मोठया प्रमाणात रेती, सिमेंट, स्टील यासारख्या सामग्रीची आवश्यकता भासते व त्यांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या किंमतीमुळे प्रकल्पाचा भांडवल खर्चही वाढतो. ही स्थिती बदलण्यासाठी वास्तुरचनाकरांनी या प्रकल्पामध्ये फ्लाय अ‍ॅश, कचरा, प्लास्टीक यासारख्या कमी खर्चिक सामग्रीचा वापर सुचवून किफायतशीर व प्रभावी संरचना तयार करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. वुमन्स एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने स्‍थानिक हॉटेल रॅडिसन ब्लू येथे आयोजित ‘पॅराडॉक्स टू पॅराडाईम ‘ या वास्तुरचनाशास्त्रावरील द्वी-दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

शेततळी, नाले यांच्या खोलीकरणातून मिळालेला गाळ, खडी यांचा वापर बुलडाणा ते अजिंठा या रस्तेनिर्मितीमध्ये केल्याने प्रकल्पाच्या खर्चात कपात झाली आहे. 2022 पर्यंत शहरी व ग्रामीण भागात ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी नागपूर शहरात राज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी औष्णिक प्रकल्पातील फ्लाय अ‍ॅशचा वापर गृहनिर्माणाकरीता वापरण्याचा निर्णय घेतल्याने कोराडी येथे 6 हजार किफ़ायतशीर घरे बांधण्यात येत आहेत. वेस्टर्न कोलफिल्डच्या खाणींतुन निघणा-या रेतीचाही वापर अशाप्रकारच्या नागपूर शहरातील गृहबांधणी प्रकल्पांमध्ये केला जात आहे.


दिल्ली मेरठ जलदगती महामार्गाच्या बांधकामातही गाझीपुर येथील कचराडेपोतील वेस्ट मटेरीयलचा वापर करण्यात आला आहे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात 5 लाख कोटींची कामे चालू असून रस्ते बांधणी क्षेत्रात आर्किटेक्टसना वाव आहे. प्रकल्प खर्चात कपात करणा-या तंत्रशुद्ध व नाविन्यपुर्ण कल्पना आर्किटेक्टसनी सुचवून परवडणा-या घरांचा निर्मीती प्रकल्प, रस्ते बांधणी तसेच जल संवर्धन क्षेत्रात योगदान द्यावे, असे आवाहनही गडकरी यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपाप्रसंगी आर्किटेक्टच्या विद्यार्थ्यांना केले.


9 ते 10 मार्च या कालावधीत झालेल्या या परिषदेत जगविख्यात आर्किटेक्टसनी विद्यार्थ्यांना तांत्रिक सत्रातून मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्य डॉ. उज्वला चक्रदेव, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.