नवी दिल्ली : १९९३ च्या मुंबई स्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि भारताचा ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगार दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मिळवलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय दबावामुळे दाऊदच्या उपस्थितीची कबुली दिल्यानंतर त्याला एका गुप्त ठिकाणी हलवले असल्याची शक्यता आहे. ही हालचाल केवळ संरक्षणासाठी नसून, आंतरराष्ट्रीय चौकशांपासून बचाव करण्यासाठीही असल्याचे सांगितले जात आहे.
पाकिस्तानचा नव्या डावाचा संशय-
गेल्या काही महिन्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाला दिलेल्या अहवालात पाकिस्तानने दाऊद कराची येथे वास्तव्यास असल्याचे मान्य केले होते. मात्र आता, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला स्थानांतरित करण्यात आले आहे. यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. भारत सरकारने यावर गंभीर दखल घेतली असून दहशतवादविरोधी उपाययोजना अधिक तीव्र करण्यात येत आहेत.
भारताची आक्रमक भूमिका-
भारत सरकारने आतापर्यंत दाऊदविरोधात अनेक ठोस पुरावे सादर केले आहेत. त्याला भारतात परत आणण्यासाठी राजनैतिक, कायदेशीर आणि गुप्तचर यंत्रणांद्वारे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या दहशतवादी समर्थनाच्या भूमिकेविरोधात आवाज उठवण्याची तयारी केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून दाऊदच्या सध्याच्या ठिकाणाचा मागोवा घेण्याची मोहीम सुरु केली आहे.
दाऊदचा शोध एक मोठं आव्हान-
दाऊदचे नेहमीच ठिकाण बदलणे, त्याच्या नेटवर्कचा आंतरराष्ट्रीय विस्तार, आणि पाकिस्तानकडून मिळणारे संरक्षण यामुळे त्याला पकडणे हे भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी कठीण आव्हान बनले आहे. मात्र, अलीकडेच राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जाहीर केलेल्या मोठ्या बक्षीसामुळे त्याच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. दाऊद किंवा त्याच्या नेटवर्कबाबत कुणाकडेही खात्रीशीर माहिती असल्यास, ती तपास यंत्रणांना पुरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भारत सरकारचा निर्धार आहे की, दाऊदला न्यायासमोर उभं करून त्याच्या गुन्ह्यांची योग्य शिक्षा मिळवून देण्यात येईल. दाऊद इब्राहिमला लपवण्याचा पाकिस्तानचा खेळ किती काळ टिकतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.