नागपूर: कोराडी येथील संघदीप बुद्ध विहारात बुद्धपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भगवान गौतम बुद्धांना अभिवादन करत उपस्थित नागरिकांना शांती, करुणा आणि प्रज्ञेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. या प्रसंगी त्यांनी बुद्धपौर्णिमेच्या शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कारही केला.
कार्यक्रमात संघदीप बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष विनोद रंगारी, सचिव राजेश बारमाटे, सुगत वाचनालयाचे अध्यक्ष पन्नालाल रंगारी, सचिव विजय वाघमारे, कोराडी ग्रामपंचायतीचे सरपंच नरेंद्र धनोले यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री बावनकुळे म्हणाले, “भगवान बुद्धांचे विचार म्हणजे जीवनाचा सच्चा प्रकाश. मेहनत, शिक्षण आणि चिकाटी हे यशाचे सूत्र आहे.” त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शैक्षणिक उपक्रमांना सरकारकडून पाठबळ-
कोराडी परिसरात होत असलेल्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक करत मंत्री बावनकुळे यांनी भविष्यात या उपक्रमांना शासनाकडून आवश्यक ती मदत आणि सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. हा बुद्धपौर्णिमा उत्सव केवळ धार्मिक श्रद्धेचा नव्हे, तर सामाजिक जागृती आणि प्रेरणेचा मार्ग बनला, असा सूर कार्यक्रमात उमटला.