मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या भागातील भारतीय लष्कराचे जनरल ऑफिसर कमांडिंग, भारतीय नौसेनेचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (महाराष्ट्र नौदल क्षेत्र), भारतीय वायुदलाचे एअर वाईस मार्शल, तसेच राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (DGP), गृह विभाग व अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजीत पवार देखील या बैठकीला हजर होते.
या बैठकीत नागरी आणि सैन्य यंत्रणांमध्ये अधिक चांगल्या समन्वयासाठी चर्चा झाली. विशेषतः गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि सायबर सुरक्षेची आवश्यकता या बाबींचा विशेष उल्लेख करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अत्यंत नेमकेपणाने आणि धाडसाने पार पाडले, यासाठी मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्यातील धोके ओळखून आपण अधिक दक्षतेने आणि एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “गुप्तचर माहितीचे वेळेवर आदानप्रदान करणे, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे आणि नागरी-सैन्य समन्वय अधिक मजबूत करणे ही काळाची गरज आहे. आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राची सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी कटिबद्ध राहायला हवे.ही बैठक राज्य व केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.