Published On : Thu, May 17th, 2018

महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राजभवन येथे सत्कार

Advertisement

मुंबई: पद्मविभूषण गुलाम मुस्तफा खान, सतारवादक पद्मभूषण पं. अरविंद पारिख तसेच राज्यातील यंदाचे पद्मश्री पुरस्कार विजेते यांचा पद्म पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आज राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

रामेश्वरलाल काब्रा, (उद्योग), शिशिर मिश्रा (कला व चित्रपट), मुरलीकांत पेटकर (क्रीडा – जलतरण) तसेच राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेता नदाफ इजाज अब्दुल रौफ यांना देखील यावेळी राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सिकल सेल आजाराबद्दल जनजागृती करणारे डॉ. संपत रामटेके यांना मरणोपरांत पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती जयाताई यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र देशातील सर्व कलाकारांचे माहेरघर : राज्यपाल
महाराष्ट्र राज्य देशातील विविध क्षेत्रातील कलाकारांचे माहेरघर आहे. शास्त्रीय संगीतातील बहुतेक सर्व घराण्यांतील श्रेष्ठ गायक, वादक तसेच शास्त्रीय नृत्य कलाकार महाराष्ट्रात आहेत. हे सांस्कृतिक नेतृत्व टिकवून ठेवण्यासाठी राज्याने कला क्षेत्रातील गुरु तसेच कलाप्रेमी शिष्यांना प्रोत्साहन तसेच शिष्यवृत्ती दिली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केले. उस्ताद गुलाम मुस्तफा खान व पंडित अरविंद पारीख यांचे संगीत क्षेत्रातील योगदान फार मोठे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्राम विकास प्रतिष्ठानतर्फे हा सन्मान सोहळाआयोजित करण्यात आला होता.

वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. कार्याध्यक्ष अविनाश नाईक, सदस्य बकुल पटेल, विनयकुमार पटवर्धन तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.