Published On : Thu, May 17th, 2018

उल्हासनगरच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : उल्हासनगर शहराचा विकास व्हावा, हे शहर सुंदर व्हावे, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करणार असून त्यासाठी निधी देण्यात येईल. कल्याण अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्यांच्या विस्थापनाचा प्रश्न एक महिन्यात मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांसंदर्भात आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ व व्यापारी संकुलासाठी महानगरपालिकेची जागा उपलब्ध आहे. हे वाहनतळ व संकुल उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत निधी देण्याचा प्राधान्याने विचार करण्यात येईल. तसेच उल्हासनगर शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी विशेष तरतूद करण्यात यावी. उल्हासनगर महानगरपालिकेस रस्ते, पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सूचना केल्या.

उल्हासनगर, अंबरनाथ व कुळगाव बदलापूर या शहरांतील घनकचरा व्यवस्थापनासाठी उसाटणे येथील भूखंडावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प उभारावा. मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानासाठी तातडीने जागेची व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.