Published On : Mon, Aug 12th, 2019

प्रवासी आणि टीसीत वाद

Advertisement

लोहमार्ग ठाण्यात पोहोचले प्रकरण, दोन्ही पक्षांनी घेतली माघार

नागपूर: महिलांच्या तक्रारीवरुन कर्तव्यावर असलेल्या टीसीने कामगारांना खाली उतरविण्यासह कारवाईची भाषा वापरली. या प्रकारामुळे कामगार संताले. यावरूनच टीसी आणि प्रवासी यांच्या वाद झाला. वाद विकोपाला पोहोचताच एक प्रवासी रक्तबंबाळ झाला. हे प्रकरण लोहमार्ग ठाण्यात पोहोचले. मात्र, कारवाईच्या भीतीने दोन्ही पक्षानी माघार घेतली. विशेष म्हणजे महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात मजुर चढले होते.
किशोर सिंग (२७) असे जखमी प्रवाशाचे नाव सांगितले जाते. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राखी निमीत्त राजस्थानात चांगला रोजगार उपलब्ध होतो. यामुळे हैदराबादचे दहा मजूर राजस्थानला जाण्यासाठी निघाले. १२८६१ विशाखापटणम – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून ते प्रवास करीत होते. जनरल डब्यात जागा नसल्याने मजुरांनी महिलांच्या डब्यात शिरकाव केला. ही गाडी सकाळी १० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचल्यानंतर काही महिला डब्यात चढल्या. अडचन होत असल्याने त्यांनी जगन नामक टीसीकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर टीसीने मजुरांना खाली उतरविण्यासह कारवाईची भाषा केली. याप्रकारामुळे मजुरही संतापले. टीसी आणि मजूरांमध्ये वाद वाढत गेला. प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहचले. धक्काबुक्कीत किशोर सिंगच्या डोक्याला दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला. धक्कबुक्कीत गाडीचा भाग लागून तो जखमी झाल्याचे टीसीचे म्हणणे आहे. तर रागाच्या भरात हातातील पेनाने मारल्याने रक्ताची धार लागल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी केला. घटनेची सूचना मिळताच लोहमार्ग पोलिसांनी मजूर आणि टीसीला ठाण्यात आणले. त्यानंतर मजुराला वैद्यकीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात नेण्यात आले. प्रकरण अंगलट येण्याची शक्यता लक्षात घेता दोन्ही पक्षांनी समोपचाराने वाद मिटवित, तक्रार न करनाच निघाले.