Published On : Mon, Aug 12th, 2019

व्हॉट्स अ‍ॅपच्या मदतीने घेतला तिचा शोध

Advertisement

संपर्क क्रांती एक्स्प्रेसमधील घटना, शिक्षण घेण्यासाठी तिने सोडले घर

नागपूर: शिक्षणामुळे क्रांती घडू शकते, याची तिला जाणिव झाली. शिक्षण घेवून मोठं होण्याचे स्वप्न ती बाळगुन होती. मात्र, आई बाबांकडून तिला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मुला मुलीत भेदभाव होत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तीने घर सोडले आणि संपर्क क्रांती एक्स्प्रेसने निघाली. लोहमार्ग पोलिसांनी व्हॉट्स अ‍ॅपवर आलेल्या छायाचित्रावरून तिचा शोध घेतला. ही घटना आज सायंकाळी ५.१० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आली.

बेंगळुरूची प्रिया (काल्पनिक नाव) १० व्या वर्गात शिकते. तिला आई वडिल आणि एक लहान भाऊ आहे. भाऊ एक वर्षांनी लहान आहे. प्रियाला शिक्षणाची आवड आहे. परंतु कुटुंबीयांकडून तिला शिक्षणासाठी पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे तिच्या लक्षात आले. उलट लहान भावाला प्रोत्साहित करतात. मुलगा आणि मुलगी यात भेदभाव केला जात असून प्रियाला दुय्यम दर्जा दिला जात असल्याने तीचा संताप वाढत गेला. शिवाय आई बाबा पुढे शिकवणार नाही, याचीही तिला कुणकुण लागली. त्यामुळे तिघे घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी नेहमी प्रमाणे घरून निघाली. तिने थेट रेल्वे स्थानक गाठले. संपर्क क्रांती एक्स्प्रेसच्या जनरल बोगीने ती प्रवास करीत होती. रात्र होऊनही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र, प्रिया कुठेच मिळून आली नाही. अखेर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. ती नागपूर मार्गे जात असल्याचे बेंगळूरू पोलिसांना समजले. त्यामुळे पोलिसांनी शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांना फोन करून प्रिया संबधी माहिती दिली. तसेच हवालदार धोंगडी यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर तिचे छायाचित्र पाठविले.

संपर्क क्रांती एक्स्प्रेस येण्यापुर्वी पोलिस हवालदार रेड्डी, हवालदार मंगला प्रधान हे दोघेही फलाट क्रमांक एकवर आले. गाडी येताच त्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर आलेले छायाचित्रावरुन प्रियाचा शोध घेतला. ती इंजिनपासून पहिल्याच जनरल बोगीत मिळून आली. विचारपूस करुन तिला ठाण्यात आणले. लगेच रेल्वे चाईल्ड लाईनच्या प्रितिनिधींना बोलाविले. त्यांनी प्रियाची चौकशी करून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आई बाबा येईपर्यंत तिला शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले आहे.