
नागपूर – मध्य रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तात्काळ कोट्यातील तिकिटांचा गैरवापर थांबवणे आणि खरी गरज असलेल्या प्रवाशांनाच सुविधा मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
या नव्या नियमांनुसार, तिकिट बुक करण्यासाठी प्रवाशांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मिळणारा ओटीपी भरावा लागणार आहे. ओटीपी पडताळणी पूर्ण झाल्यावरच तात्काळ तिकीट जारी केले जाईल. आरक्षण फॉर्ममध्ये नोंदवलेला क्रमांक बरोबर नसल्यास तिकीट मिळणे अशक्य होणार असून त्यामुळे प्रवाशांनी कागदपत्रे आणि मोबाइल क्रमांक अचूक ठेवण्याचे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
ही प्रणाली ६ डिसेंबरपासून मध्य रेल्वेच्या १३ महत्त्वाच्या गाड्यांमध्ये लागू केली जात आहे. यात दुरांतो, वंदे भारत यांसारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. सीएसएमटी–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसमध्ये हा नियम ५ डिसेंबरपासून लागू झाला असून पुणे–हैदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये तो १ डिसेंबरपासूनच वापरात आहे.
तिकीट बुकिंग पीआरएस काउंटरवर असो किंवा आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपद्वारे—सर्व ठिकाणी ओटीपी पडताळणीची अट लागू राहणार आहे. तात्काळ तिकिटांसाठी ही नवी व्यवस्था पुढील काही दिवसांत इतर गाड्यांमध्येही टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे तिकिट प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि तात्काळ कोट्याचा दुरुपयोग आळा घालण्यात मदत होईल, असा अपेक्षित परिणाम व्यक्त केला जात आहे.









