Published On : Sat, Dec 14th, 2019

अन्यथा मुख्यमंत्री निवासापुढे महापौर करणार गांधीगिरी

Advertisement

जपानी उद्यानामध्ये सकाळी शुल्क न घेण्याबाबत उपवनसंरक्षकांना निवेदन

नागपूर: सेमीनरी हिल्स येथील जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला जाणा-या नागरिकांकडून शुल्क घेण्यात येते. दररोज सकाळी फिरायला जाणा-या व्यक्तींकडून शहरातील कोणत्याही उद्यानामध्ये शुल्क घेण्यात येत नाही. त्यामुळे जपानी उद्यानातीलही शुल्क बंद करण्यात यावी, अन्यथा येत्या २० डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या निवासापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करू, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला.

जपानी उद्यानामध्ये सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेण्यात येउ नये अशी मागणी करणारे निवेदन शुक्रवारी (ता.१३) महापौर संदीप जोशी यांनी उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांना दिले. याप्रसंगी नगरसेविका प्रगती पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश गुप्ता, लाफ्टर क्लबचे किशोर ठुठेजा आदी उपस्थित होते.

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत २५ नोव्हेंबरला महापौर संदीप जोशी यांनी सेमिनरी हिल्स येथील जपानी उद्यानात नागरिकांशी संवाद साधला. शहरातील कोणत्याही उद्यानांमध्ये किमान नउ वाजतापर्यंत सकाळी फिरायला येणा-यांकडून शुल्क घेतले जात नाही. मात्र जपानी उद्यानामध्ये दररोज नागरिकांकडून शुल्क घेण्यात येते, यासंदर्भात ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’मध्ये महापौरांकडे नागरिकांनी तक्रार मांडली होती.

जपानी उद्यान मनपाच्या अखत्यारित नसून वन विभागाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे उद्यानात फिरायला येणा-यांकडून शुल्क न घेण्याबाबत नागरिकांच्या सोबतीने शहराचा महापौर म्हणून वन विभागाच्या संबंधित अधिका-यांना निवेदन देउ व त्यानंतरही शुल्क बंद झाल्यास नागरिकांसह आंदोलन करू, असे आश्वासन त्यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिले होते. त्या आश्वासनानुसार शुक्रवारी (ता.१३) महापौरांनी उपवनसंरक्षक संरक्षकांशी चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. जपानी उद्यानात येणा-यांकडून येत्या १८ डिसेंबरपर्यंत शुल्क घेणे बंद न करण्यात आल्यास २० डिसेंबरला सकाळी ७ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ‘रामगिरी’ या निवासस्थानापुढे नागरिकांसह गांधीगिरी आंदोलन करू, असा इशारा यावेळी महापौर संदीप जोशी यांनी दिला.