नागपूर: राज्यातील अद्ययावत आधार नोंदणी केंद्र प्रथम नागपूर येथे कार्यरत झाले आहे. पासपोर्ट ऑफिस परिसरात असलेल्या या केंद्राचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. याच धर्तीवर लवकरच मुंबई, पुणे येथे देखील आधार नोंदणी केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
यावेळी स्मार्ट चीप कंपनीचे सहायक महासंचालक सुमनेश जोशी, प्रादेशिक प्रमुख सुमित खत्री, प्रबंधक कॅप्टन अनिल मराठे, व्यवस्थापक निखील महाजन, प्रकल्प व्यवस्थापक श्रीमती चतुर्थी मोगरे, झोएब वली आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यामध्ये अद्ययावत आधार नोंदणी केंद्र प्रथम नागपूर येथे कार्यरत झाले आहे. या आधार नोंदणी केंद्रावर एकूण 8 नोंदणी संच कार्यरत असून लवकरच ही संख्या वाढणार आहे. या आधार नोंदणी केंद्रावर सद्यस्थितीत 18 जण काम करीत आहेत. या केंद्रावर नागरिक स्वत: https://appointments.uidai.gov.in आणि https://ask1.uidi.gov.in या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अपॉइन्टमेंट्स घेऊ शकतात. त्यांना टोकन नंबर मिळेल. त्यानंतर त्यांनी तो टोकन नंबर घेऊन त्या केंद्रावर जाऊन पुढील कार्यवाही करावी. तसेच या केंद्रावर जावून प्रत्यक्ष वेळ घेऊ शकतात. हे केंद्र आठवडाभर सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 पर्यंत कार्यरत राहील. तसेच Appointment Reschedule सुध्दा करु शकतात. नाव नोंदणी करतेवेळी संपूर्ण माहिती भरावी. या केंद्रावर दिवसाला 500 आधार नोंदणी होऊ शकते तसेच यामध्ये नवीन आधार नोंदणी, नाव बदलणे, मोबाईल तसेच इमेल बदलणे, बायोमेट्रिक बदलणे, पिनकोड बदलणे अशा सर्व सेवा उपलब्ध राहतील.
सन 2015 नुसार नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 49 लक्ष 22 हजार 81 एवढी असून यापैकी 49 लक्ष 10 हजार 782 नागरिकांची आधार नोंदणी झालेली आहे. त्याची टक्केवारी 99.78 एवढी आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 48 आधार नोंदणी संच शासकीय परिसरात आहेत. त्यापैकी एकूण 35 टपाल कार्यालयात, तर 17 बँकेत कार्यरत आहेत. याबाबत नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सहायक महासंचालक सुमनेश जोशी यांनी केले आहे.