Published On : Tue, Sep 28th, 2021

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबरला ज्येष्ठांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन

‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा होणार सत्कार : महापौरांची पत्रपरिषदेत माहिती

नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून १ ऑक्टोबर या ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने शहरात नागपूर महानगरपालिका, नागपूर स्मार्ट सिटी आणि सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. याची सविस्तर माहिती मंगळवारी (ता. २८) महापौर दयाशंकर तिवारी यांनी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यावेळी स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती व घरबांधणी विशेष समिती सभापती हरीश दिकोंडवार, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा अधिकारी पियुष आंबुलकर, सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूरचे सचिव सुरेश रेवतकर, वसंतराव पाटील, मनोहर खडसे, श्री वाकोडेकर, श्रीमती राऊत, श्रीमती महाकाळकर, माजी सैनिक संघटनेचे राम कोडके आणि पुंडलिक सावंत आदी उपस्थित होते.

१ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘सुपर ७५’ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. सत्कारमूर्तींमध्ये स्वातंत्र्य संग्राम सैनिक, शासकीय पुरस्कार विजेते, ज्येष्ठ कलावंत, सेनेमध्ये कामगिरी करणारे सैनिक, सेवानिवृत्त अधिकारी, क्रीडा पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नागरिक, साहित्यिक, सामाजिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग राहील.

तत्पूर्वी दुपारी ३.३० वाजता ज्येष्ठांतर्फे गीत गायन, नकला, मनोरंजन कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. सकाळी ७ वाजता रामनगर येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथे सूर्यनमस्कार स्पर्धा होईल. याच दिवशी मनपाने ‘बस फ्री राईड डे फॉर सिनियर सिटीझन’ घोषित केले आहे. यादिवशी संपूर्ण दिवस ज्येष्ठ नागरिक कार्ड धारकांना शहर बसमध्ये मोफत प्रवास राहील. यासोबतच याच दिवशी ज्येष्ठ नागरिकांना आपली बसमधून मोफत नागपूर दर्शन प्रवास घडविण्यात येईल. या प्रवासातून अजब बांगला, दीक्षाभूमी, स्वामी विवेकानंद स्मारक, झिरो माईल फ्रिडम पार्क आदी स्थळांचे दर्शन घडविण्यात येईल. मनपाच्या प्रत्येक झोन कार्यालयातून एक बस सोडण्यात येईल. यासाठी सिनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर सिटी या संस्थेचे सचिव सुरेश रेवतकर यांच्याकडे नोंदणी करावी लागेल, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली. याशिवाय आंतरजातीय विवाह तसेच प्रेम विवाह करणाऱ्या ज्यांचे वय ७५ वर्षापेक्षा जास्त आहे अशा जोडप्यांचे देखील मनपातर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महापौरांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक दिनी दहाही झोनमध्ये आरोग्य शिबीर
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १ ऑक्टोबर रोजी मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात येईल. यात आरोग्य तपासणी, रोगनिदान व समुपदेशन करण्यात येईल. याव्यतिरिक्त गांधीबाग झोन अंतर्गत राजकुमार गुप्ता समाज भवन बजेरिया येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येईल. यात कर्करोग, स्त्री रोग, दंतरोग, नेत्ररोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजारांची तपासणी व निदान केले जाईल. लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमध्ये फुटाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमाननगरमध्ये मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमध्ये बाबुळखेडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमध्ये नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमध्ये मोमीनपुरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमध्ये जागनाथ बुधवारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमध्ये पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आशीनगर झोनमध्ये शेंडेनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तर मंगळवारी झोनमध्ये इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आरोग्य शिबीर घेण्यात येईल. या शिबिरांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.