Published On : Mon, Oct 11th, 2021

निरोगी आरोग्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन : महापौर

Advertisement

कृष्णानगरमध्ये आरोग्य तपासणी शिबीर

नागपूर : पैशाअभावी आणि सोयीअभावी कुणीही उपचारापासून वंचित राहू नये यासाठी नागपूर शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने नागपूर महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आणि श्री हनुमान मंदिर कमेटी कृष्णानगर यांच्या वतीने गिट्टीखदान परिसरातील कृष्णानगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुनील जयस्वाल, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेविका शिल्पा धोटे, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे. ७५ हेल्थ पोस्ट हा त्यातीलच एक उपक्रम आहे. प्रत्येक नागरिकाला त्याच्या घराजवळ प्राथमिक उपचार मिळावे, हा त्यामागील हेतू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिबिरात हृदय रोग, कर्करोग, मधुमेह, मलेरिया, फायलेरिया यासोबतच अन्य सामान्य रोगांची तपासणी करण्यात आली. रक्त तपासणीसुद्धा करण्यात आली. आवश्यक त्या व्यक्तींना मोफत औषधी वाटप करण्यात आले. परिसरातील शेकडो नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमान मंदिर कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.