Published On : Mon, Oct 11th, 2021

मनपाच्या एनडीएस चमूने शहरातील सर्वधर्मीय धार्मिक स्थळ कमिटीला समजावून सांगितली कोव्हिड नियमावली

नागपूर : मिशन कवच कुंडल अंतर्गत शहरातील नागरिकांनी लसीकरण मोठ्या प्रमाणात करावे, यासाठी जनजागृती सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि सर्व धर्मीय धार्मिक ठिकाणी दोन डोज घेतलेल्यांनाच प्रवेश देण्यात यावा, असे मनपा आयुक्तांचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर आज रविवार १० ऑक्टोबर रोजी मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शहरातील विविध मंदिरांमध्ये जाऊन मंदिर व्यवस्थापन कमिटीला कोव्हिड नियमांची माहिती करून दिली. मनपा आयुक्तांचे आदेशही समजावून सांगण्यात आले.

याअंतर्गत आज दहाही झोनच्या उपद्रव शोध पथकाने संबंधित झोनमधील मोठ्या मंदिरात जाऊन कोव्हिड नियमावलीची सविस्तर माहिती मंदिर व्यवस्थापन कमिटीला दिली.

बौद्ध धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले दीक्षाभूमी, वर्धा मार्गावरील श्री साईबाबा सेवा मंडळ, श्री वर्धमाननगर जैन श्वेतांबर संघ, श्री राधाकृष्ण मंदिर वृंदावन धाम, कामठी रोड टेका नाका येथील मस्जिद, श्री दुर्गादेवी सार्वजनिक देवस्थान, नेहरु पुतळा इतवारी येथील नवरात्री दुर्गा उत्सव मंडळ, लोहापूलजवळील हनुमान खिडकी मंदिर, गंज़ीपेठ येथील श्री दुर्गा माता मंदिर, श्री रेणुका देवी देवस्थान, त्रिमूर्ती नगर रिंग रोड येथील श्री हनुमान मंदिर आदी सर्वधर्मिक धार्मिक स्थळांमध्ये जाऊन कोव्हिड नियमांची माहिती देण्यात आली.