Published On : Tue, Aug 31st, 2021

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे “स्थानिक स्वराज्य संस्था दिवसा निमित्त” आरोग्य शिबिराचे आयोजन

Advertisement

परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि वाल्मिकी नगर अंगणवाडी क्र.101 यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (ता.31) स्थानिक स्वराज्य संस्था दिवसाचे औचित्य साधून लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला परिसरातील शुन्य ते सहा वयोगटातील मुला मुलींच्या पालकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरात लहान मुलांचे वजन, ऊंची, छातीचा व पोटाचा घेर तसेच त्यांच्या प्राथमिक आरोग्यासंबंधी तपासणी करण्यात आली. डॉ. सुचित्रा पटवर्धन, डॉ. आनंद तट्टे, कर्नल डॉ.ए. आर. श्रृंगारपुरे यांनी लहान मुलांना तपासुन त्यांच्या प्राथमिक आरोग्याबद्दल त्यांच्या पालकांना सल्ला दिला. तसेच लहान मुलांच्या विकासाकरिता आवश्यक असलेल्या “मल्टीविटामिन” चे वितरण यावेळी करण्यात आले. आहार तज्ञ श्रीमती सुषमा चॅटर्जी यांनी बालकांच्या योग्य आहारासंबंधी माहिती त्यांच्या पालकांना दिली. आरोग्य शिबिराचा 70 लहान मुलांनी लाभ घेतला.

“तंदुरूस्त बच्चा – खुशहाल बच्चा” हे घोषवाक्य असलेल्या या आरोग्य शिबिराचे उद्घाटन नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक, अंगणवाडी सेविका करूणा मोटघरे व त्यांच्या सहकारी श्रीमती संकत, आशा सेविका श्रीमती उईके या उपस्थित होत्या.

यावेळी दिव्या धुरडे बोलताना संस्थेच्या कार्याची स्तुती करत संस्थेने कोवीड काळात राबविलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली. नगरसेविका झाल्यानंतर अभ्यासवर्ग काय असतो, याची माहिती मला संस्थेमार्फतच मिळाली. संस्थेने आयोजित केलेल्या अभ्यासवर्गामुळे मला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे म्हणत संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

आपल्या प्रास्ताविक भाषणात जयंत पाठक यांनी संस्थेच्या कार्याबद्दल माहिती दिली. संस्थेचे संस्थापक सी.डी.बर्फीवाला यांचा जन्मदिवस म्हणून आजचा दिवस देशभरातील सर्व केंद्रांवर साजरा करण्यात येत असल्याची माहिती जयंत पाठक यांनी दिली. सी.डी बर्फीवाला हे संस्थेचे पहिले महासंचालक असल्याचे व संस्थेला देश-विदेशात पोहोचविण्याचे श्रेय त्यांना असल्याची माहिती जयंत पाठक यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला परिसरातील नागरिक, महिला व पुरूष, तसेच स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार मंजिरी जावडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या श्रीमती राही बापट, श्रीमती निशा व्यवहारे, जयंत राजूरकर, पुष्कर लाभे, सुशील यादव, दीपक वनारे व संदीप यांनी परिश्रम घेतले.