Published On : Tue, Aug 31st, 2021

शहरातील जाहिरात फलकांसाठी नवीन धोरण निश्चित करा!

स्थापत्य समिती सभापतींचे निर्देश : विविध प्रकल्पांचा घेतला आढावा

नागपूर: शहरात जाहिरातींसाठी असलेल्या फलकांसंदर्भात सन २००२ मध्ये धोरण निश्चित करण्यात आले होते. आज २० वर्षे लोटली. लोकसंख्या, परिस्थिती बदलली. शहर बदलले. त्यामुळे या फलकांसंदर्भात नवीन धोरण निश्चित करण्यात यावे, वैध, अवैधरीत्या शहरात लागलेल्या फलकांचे एक सर्व्हेक्षण करण्यात यावे आणि ग्राऊंड रेंट न भरणाऱ्या एजंसीवर तातडीने कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचा आणि मनपाच्या जाहिरात विभागामार्फत एजंसीला देण्यात आलेल्या जाहिरात फलकांबाबतचा आढावा मंगळवारी (ता. ३१) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला. बैठकीत सभापती राजेंद्र सोनकुसरे, सदस्या रूपा राय, आशा उईके, मनोजकुमार गावंडे, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण, स्थावर अधिकारी राजेंद्र अंबारे, नगररचनाकार हर्षल गेडाम, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, श्रीकांत वैद्य सहभागी झाले होते.

सदर बैठकीत जाहिरात एजंसीबाबत माहिती घेण्यात आली. अनेक जाहिरात एजंसीमार्फत शहरात काही ठिकाणी अवैधरीत्या फलक लावण्यात आले आहेत. काहींनी ग्राऊंड रेंट अदा केलेला नाही. जाहिरात विभाग हे उत्पन्नाचे स्त्रोत आहे. ग्राऊंड रेंट न भरल्याने मनपाच्या उत्पन्नात घट होते. अशा एजंसींना काळ्या यादीत टाका, काही ठिकाणी सरप्राईज व्हिजीट देऊन यासंदर्भातील अहवाल पुढील सात दिवसांत सादर करण्याचे निर्देशही सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी दिले.

जाहिरात फलकांचा आता ‘जीआयएस बेस्ड्‌ सर्व्हे’
जाहिरात विभागातर्फे यापुढे आता शहरातील प्रत्येक फलकांना जीआयएस टॅगींग केले जाणार आहे. जीआयएस बेस्ड्‌ सर्व्हे प्रस्तावित असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सर्व्हेक्षणाला किमान चार महिने लागतील. या सर्व्हेक्षणानंतर एक अहवाल सादर करून जाहिरात नियमावलीत काय बदल करायचे, याचा अहवाल स्थापत्य समितीपुढे सादर करण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी यावेळी दिली.

विविध प्रकल्पांचा आढावा
यावेळी स्थापत्य समिती सभापती राजेंद्र सोनकुसरे यांनी शहरातील प्रस्तावित विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. ऑरेंज स्ट्रीट प्रकल्प, बुधवार बाजार महाल, बुधवार बाजार सक्करदरा, कमाल टॉकीजजवळील प्रकल्प, टाऊन हॉलचे बांधकाम, नवीन महाल झोन कार्यालय, स्व.प्रभाकरराव दटके रुग्णालय, बाळासाहेब स्मारक चिटणीसपुरा, शाहू वाचनालय चिटणीसपुरा, महाल मासोळी बाजार, आयसोलेशन हॉस्पीटल, मातोश्री जिजाऊ उद्योजिका भवन, यशवंत स्टेडियम प्रकल्प आदींची प्रगती जाणून घेतली. यातील काही प्रकल्पांबाबत कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी माहिती दिली. ह्या प्रकल्पातील अडचणी तातडीने दूर करून लवकरात लवकर याबाबतची निविदा प्रक्रिया अथवा अन्य कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश यावेळी सभापती सोनकुसरे यांनी दिले.