नागपूर : कालिदास यांच्या “ऋतूसंहार” वर आधारित यंदाच्या कालिदास महोत्सवाचे आयोजन 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महानगरपालिका आयुक्त अश्विन मुदगल व इतर अधिकारी उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, नागपूरकर रसिक श्रोत्यांसाठी मोठीच मेजवानी राहणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता कालिदास महोत्सवाचे उद्घाटन होणार असून पहिल्या दिवशी सप्तक प्रस्तुत सहा ऋतूंचे सहा सोहळे ऋतूंवर आधारित रागांचे शास्त्रीय गायन आणि वादन असणार आहे.
त्यामध्ये अरविंद उपाध्ये यांचे बासरीवादन, शिरीष भालेराव यांचे व्हायोलिन, अरविंद शेवलीकर यांचे सितारवादन तर अनिरुध्द देशपांडे, सायली आचार्य आणि रेणुका इंदुरकर या त्रिकुटाचे शास्त्रीय गायन असेल.
रात्री 8.30 वाजता पूरबाई या कार्यक्रमांअंतर्गत कोलकात्ता येथील देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्यातील हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व सितार जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. या विशेष उद्घाटन कार्यक्रमाचे संचलन श्रीमती रेणुका देशकर करणार आहेत, असे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
दुस-या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता नागपूरकरांना मन वृंदावन या शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय गायन कार्यक्रमांअंतर्गंत श्रीमती आस्था गोस्वामी यांना ऐकता येणार आहे. तर सायंकाळी 7.45 वाजता उपस्थितांना थक्क करणारे पुण्याच्या नादरुप ग्रूपच्या गुरु शमा भाटे आणि त्यांच्या चमूची कथ्थक नृत्य नाटीका पाहायला मिळणार आहे. तसेच रात्री 9 वाजता नवी दिल्लीच्या पंडीत उदयकुमार मल्लिक यांच्या धमारवरील धृपद धमार गायनाचा कार्यक्रम असल्याचे विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी सांगितले.
तर शेवटच्या दिवशी सायंकाळी ऋतूचक्र या शास्त्रीय गायन कार्यक्रमांतर्गंत मुंबईच्या पं. रोनू मजुमदार आणि पं.सतीश व्यास यांच्यातील जुगलबंदी ऐकायला मिळेल. त्यानंतर सायंकाळी 7.15 वाजता वसंतरास या कार्यक्रमांतर्गंत ओडीशी समूह नृत्यामध्ये भोपाळच्या बिंदू जुनेजा आणि त्यांच्या चमूचे नृत्य पाहायला मिळणार आहे. तर रात्री 8.45 वाजता ऋतूरंग कार्यक्रमांतर्गंत पुण्याचे संजीव अभ्यंकर आणि मुंबईच्या अश्विनी भिडे-देशपांडे यांच्यातील शास्त्रीय गायनातील जुगलबंदी नागपूरकर रसिकांना याची देही याची डोळा अनुभवता येणार आहे. हा कार्यक्रम निशुल्क असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.