Published On : Tue, Oct 24th, 2017

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये सिंचनासाठी 75 हजार विहिरींचा विशेष प्रस्ताव तयार करा – चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागपूर : विदर्भात सिंचनाच्या क्षेत्रात वाढ करणे, तसेच कोरडवाहू जमीन सिंचनाखाली आणण्याच्या दृष्टीने विदर्भ सघन सिंचन कार्यक्रम अंमलबजावणी सुरू आहे. याअंतर्गत सिंचन विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करुन सुमारे 1 हजार 100 कोटी रुपयांचे प्रस्ताव जलसंपदा विभागाने येत्या तीन आठवड्यात सादर करावे, अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिल्या.

सिंचन भवन येथे पेंच प्रकल्पातंर्गत लाभक्षेत्रामध्ये सिंचन सुविधांच्या विकासासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.

Gold Rate
07 May 2025
Gold 24 KT 97,500/-
Gold 22 KT 90,700/-
Silver/Kg 96,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता रसिक चव्हाण, नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनचे अप्पर महाप्रबंधक मनिष साठे, जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता ज.द. टाले, पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण मंडळाचे अधीक्षक अभियंता ज.द. बोरकर, पेंच पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जे.बी. तुरखेडे, नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता नि.रा.बनगिनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता जयंत इंगळे, कृषी विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती पी.टी. गोलघाटे उपस्थित होत्या.

विदर्भ सघन सिंचनाचे प्रस्ताव केंद्रीय जलसंधारण खात्याकडे सादर झाल्यानंतर त्याला निधी उपलब्ध होईल व विदर्भातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच राज्य शासनाची मुख्यमंत्री ‘सौर कृषी वाहिनी योजना’ ही राष्ट्रीय योजना व्हावी यासाठी कृषी, जलसंधारण आणि ऊर्जा या तीनही विभागांनी राष्ट्रीय योजनेसाठी प्रस्ताव तयार करुन ते केंद्र शासनाकडे सादर करावेत. ही योजना राष्ट्रीय योजना व्हावी, अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजना राबविणे आवश्यक असल्याचे सांगताना पालकमंत्री म्हणाले की, 50 हजारापेक्षा जास्त सूक्ष्म सिंचन योजनांसाठी 1 हजार 700 कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार करताना लाभक्षेत्रात 75 हजार विहिरी आणि सोलरवर विहिरींचे विजेच्या जोडणीचा यामध्ये समावेश करावा. सहा उपसा जलसिंचन योजना यासाठी दोन भागात प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिले.

जिल्हा परिषदेकडील मौदा, कामठी आणि पारशिवनी तालुक्यातील जलसंधारणाची 137 कामे स्थानिक स्तर विभागाकडे वळती करतांनाच कन्हानवर चार बॅरेजेस बांधण्यासोबतच मायनी येथे पुलवजा बंधारा बांधून उपलब्ध होणारे पाणी पेंच कालव्याद्वारे सिंचनासाठी उपलब्ध होईल. भविष्यात नागपूर शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पेंच प्रकल्पामधून सिंचनासाठी अतिरिक्त सुविधा निर्माण करणे आवश्यक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅरेजेस व बंधारे तयार करण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या वीज प्रकल्पांना पुनर्वापर केलेले पाणी वापरण्याच्या धोरणानुसार मौदा येथील एनटीपीसीला वीज प्रकल्पासाठी भांडेवाडी एसटीपी प्रकल्पातूनच मनपाने पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना करताना पालकमंत्री म्हणाले की, खापरखेडा व कोराडी येथील प्रकल्पासाठी सांडपाणी शुध्द केलेले पाणी वापरण्यात येत आहे. पुनर्वापर केलेले पाणी औष्णिक वीज केंद्रांना उपलब्ध करून दिल्यामुळे पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असल्याचेही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Advertisement