Published On : Sat, Oct 16th, 2021

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवसानिमित्त चर्चासत्राचे आयोजन

Advertisement

नागपूर : “अचानक येणाऱ्या आपत्तीसाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही सजग राहणे गरजेचे आहे” असा सूर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, नागपूर द्वारे आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण दिवसानिमित्त आयोजित “शहरी आपत्ती : शहरी संस्थांक्या सक्षमतेसाठी नीती व उपाययोजना” या विषयावरील चर्चासत्रात उमटला.

या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून कर्नल अभय पटवर्धन, सावनेर नगरपरिषदेचे प्रमुख अग्निशमन अधिकारी निरज काळे, तिरपुडे महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका डॉ. अरूणा गजभिये, दै.हितवादचे मुख्य प्रतिनिधी कार्तिक लोखंडे, विभागीय संचालक जयंत पाठक, माजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अप्रुप अडावतकर प्रामुख्याने उपस्थित होते. शहरी संस्थांना सक्षम करण्यासाठी आवश्यक निती व उपाययोजना याविषयावर वक्त्यांनी प्रकाश टाकला.

निरज काळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात असलेली सद्यस्थिती याविषयावर बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थां मधील उपलब्ध व्यवस्था आणि असलेल्या अडचणी, त्यावर यशस्वीपणे मात करून नगरपालिका कशा कार्यरत आहेत याविषयी त्यांनी माहिती दिली. आपत्ती निवारणासाठी प्रशासनाने व नागरिकांनी कोणती काळजी घ्यायवयाची याबाबत त्यांनी आपल्या सादरीकरणामध्ये विवेचन केले. प्रशिक्षित मनुष्यबळ, संसाधने व निधी यांचे नियोजन नगरपालिकांनी आपत्ती व्यवस्थापना करिता करणे कसे आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला.

डॉ. अरूणा गजभिये यांनी शहरी संस्थांची क्षमता बांधणी करिता करावयाच्या उपाययोजना याविषयी चर्चा केली. शहरातील अनेक संस्थांमध्ये आपत्ती निवारणासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध असते, परंतु ती हाताळायची कशी याबाबत प्रशिक्षण नसते, ते ज्ञान असणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मॉक ड्रील, रंगीत तालिम घेणे गरजेचे असते. प्रशासनाची सकारात्मकता व प्रगतिशील दृष्टीकोण असणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये जागरूकता करणे ही महत्त्वाचे आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीनंतरचे नियोजन कसे असावे, यावर अरूणा गजभिये यांनी प्रकाश टाकला. आपत्ती आल्यानंतर नागरिकांचे मानसिक संतुलन फार खचून जातं, अशा वेळी नागरिकांना मानसिकरित्या सक्षम कऱणे हे देखील आव्हान प्रशासनासोबत सहकार्य करून सांभाळणे गरजेचे असते, असेही त्या म्हणाल्या.

आपत्ती निवारणासाठी भाग धारकांचा सहभाग या विषयावर बोलताना दैनिक हितवादचे मुख्य प्रतिनिधी कार्तिक लोखंडे आपत्ती व्यवस्थापन न करता पूर्वी झालेल्या घटना व इतर डेटा अद्यायावत असणे गरजेचे असते असे सांगून याबाबत माध्यमाद्वारे अनेकदा बातम्या प्रकाशित केल्या जातात, त्याची दखल स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी असेही पुढे सांगितले. अनेक आपत्ती या मानवी चुकांमुळे घडताना दिसून येतात. वाढते अतिक्रमण रोखणे, नदी पात्रात केलेले बांधकाम यामुळे त्याचा फटका नागरिकांना पूरग्रस्त भागात दिसून आला. नागपुरात सीमेंट रस्ते बांधतांना पाण्याचा निकास होईल अशी व्यवस्था असणे आवश्यक ठरते. याबाबतही माध्यामांमध्ये, सोशल मिडियावर अनेक बातम्या, व्हिडिओ प्रसारित होताना दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी शिवनीमध्ये आलेल्या भुकंपाचे कारण शोधले असता वाढत्या खाणींमुळे जमीनीतमध्ये पोकळी निर्माण झाली, त्या पोकळीमध्ये भराव म्हणून रेती टाकली जाते, ते काम व्यवस्थित न झाल्यामुळे, असे प्रकार होत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला, असेही कार्तिक लोखंडे यावेळी म्हणाले. शहरात प्रदूषण दर्शक इंडेक्स वेळोवेळी तयार करणे गरजेचे असते. त्याबाबतही कार्तिक लोखंडे यांनी माहिती चर्चासत्रांमध्ये दिली.

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी शहरी संस्थांची भविष्यातील वाटचाल हा विषय मांडताना 74 व्या घटना दुरूस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेल्या जबाबदाऱ्या व त्यांची आपत्ती व्यवस्थापनामध्ये असलेली भूमिका विशद केली. यामध्ये शहराचा विकास आराखडा, पाणी व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्य, आपत्ती निवारण व्यवस्थापन आराखडा, अग्निशमन, पर्यावरण व्यवस्थापन या सारख्या विषयांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी काम करणे अंतर्भूत आहेत.

अध्यक्षीय भाषणात बोलताना कर्नल अभय पटवर्धन यांनी आपत्ती निवारण व्यवस्थापनासाठी योग्य प्रमाणात निधी मिळतो. पण, या निधीचे नीट व्यवस्थापन होत नाही. साध्या – साध्या, छोट्या आपत्तीमधून कसे सावरायचे याचे ज्ञान प्रत्येकांना देणे गरजेचे आहे. नागपूरला पुराच्या दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. परंतु, पूर सदृश्य परिस्थिती नसताना देखील तत्पर राहणे गरजेचे आहे. मोवाडमध्ये आलेल्या पुरानंतर तसा प्रकार घडला नाही. प्रकार घडला नसला तरिही ती निवारण्यासाठी सक्षम आहोत का ? याचा विचार प्रशासनाने करायला हवा, असेही कर्नल पटवर्धन यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्रुप अडावतकर यांनी केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.