
नागपूर : शहरातील रेशीमबाग मैदान येथे २६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान पाच दिवसीय भव्य ‘श्री राम कथा’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र कथामहोत्सवात बागेश्वर धाम पीठाधीश्वर परमपूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्रीमुखातून रामकथेचे वाचन व आशीर्वचन होणार आहे. या आध्यात्मिक सोहळ्यास दररोज हजारो रामभक्त उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन बागेश्वरधाम सेवा मंडल, नागपूर (जनकल्याण बहुउद्देशीय संस्था), ओम शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, बुटीबोरी तसेच बागेश्वर धाम शिष्य मंडल, उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे.
या कथामहोत्सवाच्या पूर्वसंध्येला २५ एप्रिल २०२६ रोजी भव्य कलशयात्रा काढण्यात येणार आहे. ही कलशयात्रा सकाळी ७ वाजता नंदनवन येथील श्री श्यामधाम मंदिरातून सुरू होऊन रेशीमबाग मैदानापर्यंत पोहोचेल. या यात्रेत सुमारे १००० श्रद्धाळू सहभागी होण्याचा अंदाज आहे.
याशिवाय २६ ते ३० एप्रिलदरम्यान दररोज सकाळी ९.३० ते ११ या वेळेत श्री हनुमंत यज्ञ पार पडणार आहे. तर रामकथा दररोज सायंकाळी ४.३० वाजता सुरू होऊन हरि इच्छेपर्यंत चालणार आहे.
कार्यक्रमासाठी आयोजकांकडून भव्य आणि प्रशस्त मंचाची उभारणी करण्यात येत असून दररोज सुमारे २५ ते ३० हजार भाविकांच्या उपस्थितीची शक्यता लक्षात घेऊन व्यापक बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमारे २००० स्वयंसेवक सेवा कार्यात सहभागी होणार आहेत.
भाविकांसाठी निःशुल्क प्रसाद वितरण तसेच परिसरातील शाळा, महाविद्यालये आणि मैदानांमध्ये मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आध्यात्मिक महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीकडून करण्यात आले आहे.








