
मुंबई : नागपूरमधील स्फोटक तयार करणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात २२ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत उमटले. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरत कामगारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
विधानसभेत विरोधी पक्षातील सदस्यांनी सांगितले की, स्फोटक किंवा धोकादायक उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेकडे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अशा ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी कठोर सुरक्षा उपाययोजना आणि नियमांचे काटेकोर पालन अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कारखान्यात यापूर्वीही सुरक्षेसंदर्भात तक्रारी व गुन्हे दाखल झाले होते, तरीही प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई का केली नाही, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना उद्योग राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात संबंधित कारखान्याविरोधात यापूर्वी सहा गुन्हे नोंदविण्यात आल्याचे समोर आले आहे. कामगार विभागाकडून कारखान्याचे वेळोवेळी सुरक्षा ऑडिट करण्यात आले होते. मात्र तरीही ही दुर्घटना घडल्याने त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सरकारने या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित कारखाना तातडीने बंद करण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. चौकशीत निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील स्फोटक व इतर धोकादायक उद्योगांचे व्यापक सुरक्षा परीक्षण करण्याची मागणीही अनेक सदस्यांनी केली. कामगारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सरकार आवश्यक ते कठोर निर्णय घेईल, असे आश्वासन देण्यात आले.








