Published On : Tue, Oct 5th, 2021
By Nagpur Today Nagpur News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करा – जिल्हाधिकारी

Advertisement

• 75 आठवड्याचा आराखडा करावा
• फिट इंडिया फ्रीडम रणचे आयोजन
• ऑनलाईन कार्यक्रमावर भर द्यावा
• प्रत्येक विभागाचा सहभाग असावा

भंडारा:- भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने देशभरात ‘अमृत महोत्सवी भारत’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमात प्रत्येक विभागाने 75 आठवड्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना लोकसहभागातून वैविध्यपूर्ण कार्यक्रम आयोजित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केल्या.

Gold Rate
10 july 2025
Gold 24 KT 97,000 /-
Gold 22 KT 90,200 /-
Silver/Kg 1,07,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, श्रीपती मोरे, मनीषा दांडगे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सादरीकरण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली.

विश्वगुरु भारत, भारताची समृद्ध परंपरा, संस्कृती, वारसा, स्वातंत्र्योत्तर भारताची प्रगती, आत्मनिर्भर भारत, आम्ही भारताचे लोक, स्वातंत्र्य इत्यादी विषयावर कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. प्रत्येक आठवड्यात एक कार्यक्रम करण्यावर भर देण्यात यावा. प्रत्येक विभागाने वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे कॅलेंडर तयार करून पाठवावे असे त्यांनी सांगितले. कोविड प्रोटोकॉलचे पालन करूनच कार्यक्रम आयोजित करावे. शक्यतो ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करण्यावर भर द्यावा असे त्यांनी सुचविले.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ कार्यक्रम जिल्हाभर आयोजित केला जाणार आहे. याची सुरुवात एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात सामूहिक राष्ट्रगीत गाऊन केली जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतरचा कार्यक्रम फिट इंडिया फ्रीडम रणचा असणार आहे. हा कार्यक्रम सुद्धा एकाच वेळी जिल्हाभर आयोजित करावा असे ते म्हणाले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात विद्यार्थी, नागरिक, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबातील सदस्य, ज्येष्ठ नागरिक, कलावंत व अधिकारी- कर्मचारी यांना सहभागी करून घेण्यात यावे.

15 ऑगस्ट 2023 पर्यंत चालणाऱ्या ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ इंडिया@75 व आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमात प्रत्येक विभागाने विविध कार्यक्रम आयोजित करून आपले योगदान देणे आवश्यक आहे. तसेच कार्यक्रमाची थोडक्यात माहिती, छायाचित्रे व व्हिडीओ www.amritmahotsav.nic.in या केंद्र सरकारच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात यावीत. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

कार्यालयीन पत्रव्यवहार तसेच प्रत्येक कार्यक्रमाच्या पत्रिका, बॅनर आदींवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा ‘लोगो’ आवर्जून टाकावा. शासकीय कार्यालयांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी केलेल्या पत्रव्यवहारावर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘लोगो’ नसल्यास ते पत्र ग्राह्य मानण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement