Published On : Mon, Aug 26th, 2019

सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा ऑनलाईन द्वारे रकमेचा परतावा

Advertisement

नागपूर :सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना यंदा महावितरणकडून शिल्लक रकमेचा परतावा ऑनलाईन करण्यात येणार आहे. यामुळे वेळेची बचत होणार असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गणेश मंडळांना प्राधान्याने वीजजोडणीसाठी देण्याचे निर्देश देण्यात आले असून वीजभार ०.५ किव्होकरिता एक हजार रूपये वीजजोडणी खर्च आकारण्यात येईल. मंडळाच्या वीजभारानुसार सुरक्षा ठेव रक्कम आकारण्यात येईल. गणेश उत्सव संपल्यानंतर ही रक्कम मंडळाच्या खात्यात महावितरणकडून ऑनलाईनद्वारे परतावा करण्यात येईल. मंडळाने सुरक्षिततेच्या जबाबदारीबाबत स्वत:चे प्रमाणपत्र (सेल्फ सर्टीफिकेशन), बँक खात्याची माहिती व मेाबाईल क्रंमाक द्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २७ पैसे अधिक १ रुपया २८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे वीजदर आहेत. सर्वधर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी घेतलेल्या वीजजोडणीद्वारे वीजवापरासाठी केवळ एकच वीजदर आकारण्यात येत आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात वीज वापरली तरीही शेवटच्या युनिटपर्यंत केवळ ४ रुपये ५५ पैसे प्रतीयुनिट एवढाच दर आकारण्यात येईल.

वीजजोडणी तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत पावसाची शक्यता आहे. पावसामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजयंत्रणेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी व नसल्यास त्वरित अर्थिंग करून घ्यावे. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावेत. हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.श्रीगणेशांच्या दर्शनाला आणि विविध ठिकाणी देखावे पाहण्यासाठी गर्दी करतात. अशा गर्दीच्या ठिकाणी पावसामुळे वीजसुरक्षेबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.