Published On : Tue, Jun 2nd, 2020

लॉन/हॉलसाठी जमा केलेली अमानत रक्कम परत करण्यासंदर्भात आदेश द्या – काँग्रेसचे गृहमंत्र्यांना निवेदन

नागपूर. कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्वच लग्नकार्य रद्द झालीत. मात्र, लॉन व मंगल कार्यालयाला दिलेली अनामत रक्कम देण्यास संबंधित लॉन मालक टाळाटाळ करत असल्याने वधू-वर पक्षाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने अनामत रक्कम परत करण्यासंदर्भात आदेश काढावा अशा मागणीचे निवेदन काँग्रेसकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले.

साधारण दिवाळीपासून लग्नकार्य कार्यक्रम आरंभ होतात. त्यामुळे 3-5 महिन्यांपूर्वीच मंगलकार्यालय किंवा लॉन बुकिंग करावे लागते. परंतु यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व लग्नकार्य रद्द झाले. या दरम्यान ठरविण्यात आलेल्या लग्न कार्यासाठी वधू-वर पक्षाकडून आधीच बुकिंग करण्यात आली होती. त्यासाठी मोठी अनामत रक्कम देखील जमा केली होती. परंतु अचानक उध्दभवलेल्या या परिस्थितीमुळे वर्षभर लग्नसोहळे होणार नाहीत. मात्र, अनामत रक्कम परत मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना लॉन मालक टाळाटाळ करीत आहेत.

त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यासंदर्भात पिडीतांनी कुणाकडे जावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सदर अडचणीचे गांभीर्य ओळखून राज्य शासनाने अनामत रक्कम परत करण्यासंदर्भात आदेश काढावा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंबलकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन केली. तसे निवेदन गृहमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी किरण राऊलवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. प्रणितकुमार जांभुले, पियुष वाकोडीकर युवक कांग्रेस प्रदेश सचिव, मयूर मोहोड द प महासचिव, रोशन इंगळे द प महासचिव यू कांग्रेस आदी उपस्थित होते.

लवकरच आदेश निघणार
या संदर्भात राज्य शासनाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू नये यासाठी लवकरच राज्य शासन अनामत रक्कम परत करण्याचे आदेश काढणार असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांनी दिली.