Published On : Tue, Jun 2nd, 2020

वादळी वाऱ्यामुळे १० लाखाचे नुकसान

अनेक भागात वीज पुरवठा सुरळीत

नागपूर: मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे नागपूरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून. प्राथमिक अंदाजानुसार १० लाखाचे नुकसान झाले असून, या भागात खंडित झालेला वीज पुरवठा अनेक ठिकाणी सुरळीत करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.

रविवार दिनांक ३१ मे आणि सोमवार दिनांक १ जून रोजी नागपूर शहरासह ग्रामीण भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. वादळीवाऱ्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात महावितरणच्या यंत्रणेचे नुकसान झाले. ग्रामीण भागात महावितरणचे उच्च दाबाचे ४६ आणि लघु दाबाचे १०५ वीज खांब जमीनदोस्त झाले. सोबतच १२ रोहित्र यामुळे नादुरुस्त झाले. वादळीवाऱ्याचा सर्वाधिक फटका महावितरणच्या मौदा विभागास बसला. मौदा विभागातील मौदा,रामटेक, कामठी, कन्हान, झुल्लर, वडोदा या गावात विजेचे खांब जमीनदोस्त झाले. १२ पैकी ५ रोहित्र मौदा विभागात नादुरुस्त झाल्याची माहिती आमझरे यांनी दिली.

दोन दिवस झालेल्या वादळीवाऱ्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उच्च दाबाचे ४६ विजेचे खांब पडल्याने १ लाख १२ हजार रुपयांचे, १०५ विजेचे खांब पडल्याने ३ लाख १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उच्च दाबाच्या २. ६ किलोमीटर वीज वाहिनीचे ६१ हजार रुपयांचे तर ११. किलोमीटर लांबीच्या वीज वाहिनीचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. १२ रोहित्र नादुरुस्त झाल्याने १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

वादळी वाऱ्याचा फटका काटोल विभागातील रिधोरा,बाजारगाव,सावरगाव,जलालखेडा, सावनेर विभागातील गोंडखैरी, कळमेश्वर, उमरेड विभागातील कुही, मोहाडी, डोंगरगाव, मकरधोकडा या गांवाना बसला होता. येथे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले असून काही ठिकाणी विजेचे खांब उभारणीचे काम सुरु असल्याने येत्या २ दिवसात येथील वीज पुरवठा सुरळीत होईल. अशी माहिती महावितांकडून देण्यात आली.

उमरेड विभागातील डोंगरगाव वीज उपकेंद्र रविवारी रात्री बंद पडले. परिणामी या वीज केंद्रातील सुमारे ५६०० वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खण्डित झाला होता. पण महावितरणकडून रात्रीच या परिसरातील वीज पुरवठा टप्याटप्यात सुरळीत करण्यात आला. ग्रामीण भागातील एकूण ५७ गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. यात कापशी, चाफेगडी, निमखेडा, पाचगाव अडका, सुरगण आदींचा समावेश आहे. आज दिवसभरात यातील बहुतेक गावातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले. बुटीबोरी विभागात वरोडा एथ , रुई आणि झारी येथे १४, पेवठा येथे ३, बनवाडी १३ आणि गौसी ४ विजेचे खांब रविवारी जमीनदोस्त झाले. महावितरणकडून या परिसरात युद्ध पातळीवर काम करून अनेक भागात विजचे खांब उभे करून वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.