नागपूर : मोबाईल, संगणक आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे हाताने लिहिण्याची सवय कमी होत असताना लेखणीची जादू पुन्हा अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळणार आहे. ऑरेंज सिटी अक्षर फाउंडेशन आणि शासकीय चित्रकला महाविद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी ‘ऑरेंज सिटी फाउंटेन पेन शो २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकला महाविद्यालय, दीक्षाभूमी येथे होणारा हा मध्य भारतातील पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
डिजिटल युगात लोप पावत चाललेल्या लेखन संस्कृतीचे जतन करणे, फाउंटेन पेनची ओळख नव्या पिढीला करून देणे आणि पर्यावरणपूरक लेखन साहित्याचा प्रसार करणे हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. पत्रकार परिषदेत संयोजक तथा व्हीएमव्ही महाविद्यालयाचे प्राचार्य अभय मुद्गल यांनी ही माहिती दिली.
या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनात देश-विदेशातील नामांकित पेन आणि लेखन साहित्य निर्माते सहभागी होणार आहेत. आसा, रंगा, मोही, लोटस, वझीर, एलिका, व्हिंटेज रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स, पेन बुटीक नागपूर, ला पेन्स व्हिंटेज पेन्स आणि लिखित यांसह अनेक प्रसिद्ध ब्रँड्स व विक्रेत्यांची पेने येथे पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे, दुर्मिळ, जुन्या आणि हस्तनिर्मित फाउंटेन पेन्स पाहण्यासोबतच खरेदी करण्याची संधीही पेनप्रेमी आणि संग्राहकांना मिळणार आहे.
पेन दुरुस्ती आणि निब कस्टमायझेशनचे प्रात्यक्षिक-
या शोमध्ये देशातील प्रसिद्ध ‘निब मिस्टर’ समीर मेहता आणि पेन क्षेत्रातील तज्ज्ञ युसूफ मन्सूर विशेष उपस्थित राहणार आहेत. जुन्या पेनांची दुरुस्ती, निबचे कस्टमायझेशन तसेच शाईचा प्रवाह सुरळीत ठेवण्याच्या तंत्राचे ते प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. त्यामुळे पेनप्रेमींना या क्षेत्रातील बारकावे जाणून घेण्याची संधी मिळणार आहे.
कॅलिग्राफी आणि हस्ताक्षर स्पर्धांचे आकर्षण-
प्रदर्शनात तज्ज्ञ सुलेखनकारांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफीची प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. बेसिक व ॲडव्हान्स्ड कॅलिग्राफीसोबतच मॉडर्न ब्रश लेटरिंग आणि कर्सिव्ह रायटिंगची आधुनिक तंत्रे शिकता येतील. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह हौशी कलाकारांसाठी हस्तलेखन आणि कॅलिग्राफी स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. परीक्षकांकडून सहभागींच्या हस्ताक्षराचे विश्लेषण करून त्यांना सुधारण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले जाणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार आहेत.
‘पेन थेरपी’तून तणावमुक्तीचा संदेश-
केवळ लेखन साहित्याचे प्रदर्शन एवढ्यापुरताच हा उपक्रम मर्यादित नसून लेखनाचा मानसिक आरोग्याशी असलेला संबंधही अधोरेखित केला जाणार आहे. ‘पेन थेरपी’ या विशेष संकल्पनेतून हाताने लिहिण्यामुळे एकाग्रता वाढवणे, तणाव कमी करणे आणि विचारांमध्ये स्पष्टता आणणे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पेन आणि कागदाच्या नियमित वापरातून लेखनाची सवय कशी विकसित करता येईल, याचेही अनुभवात्मक सत्र आयोजित केले जाणार आहे.
प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी फाउंटेन पेनचा पर्याय-
वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या पार्श्वभूमीवर फाउंटेन पेनचा वापर हा पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून केला जाणार आहे. वापरून फेकून देण्याच्या पेनांऐवजी पुन्हा शाई भरून वापरता येणाऱ्या फाउंटेन पेनचा स्वीकार केल्यास प्लास्टिक कचरा कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे शाश्वत लेखन साहित्याचा वापर करण्याचे आवाहनही या माध्यमातून केले जाणार आहे.
सततचा स्क्रीन टाइम, मोबाईल आणि लॅपटॉपवरील टायपिंग यामुळे नव्या पिढीचा हस्तलेखनाशी संपर्क कमी होत आहे. अशा परिस्थितीत हाताने लिहिण्याची सवय, स्मरणशक्ती आणि विचारप्रक्रियेतील स्पष्टता यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे अधिष्ठाता विश्वनाथ साबळे, संयोजक डॉ. अतीष बकाने आणि डॉ. पायल गोटेफोडे उपस्थित होते.




