Published On : Tue, Nov 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

विदर्भातील संभाव्य जलसंकट रोखण्यासाठी नटराज निकेतनचा पुढाकार; जलसंवर्धनाची विशेष मोहीम!

Advertisement

विदर्भातील संभाव्य जलसंकट रोखण्यासाठी नटराज निकेतनचा पुढाकार; जलसंवर्धनाची विशेष मोहीम!

नागपूर : विदर्भातील वाढती पाणीटंचाई आणि भूजलपातळीत होणारी घट लक्षात घेता भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी नटराज निकेतन संस्थेने पुढाकार घेतला आहे. जनजागृती, लोकसहभाग आणि शासकीय यंत्रणेच्या सहकार्याने संपूर्ण विदर्भात जलसंवर्धन व जलसंरक्षणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे, पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

या मोहिमेअंतर्गत घराघरांत, कार्यालयांमध्ये, गावपातळीवर आणि शहरांमध्ये वर्षा जलसंधारणाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पावसाचे पाणी विहिरींमध्ये जिरवून भूजलपातळी वाढविणे, पाण्याचा पुनर्वापर करणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नाल्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर

या मोहिमेतील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे नाल्यांमधील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग बांधकाम, रस्ते आणि स्वच्छतेसाठी लागणारी विविध उत्पादने तयार करण्यासाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे स्वच्छ पाण्यावरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे.

Advertisement

नागरिकांना मोफत तांत्रिक मार्गदर्शन-

जलसंवर्धनासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, त्याचा वापर आणि योग्य पद्धती याबाबत नटराज निकेतन संस्थेतर्फे नागरिकांना मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी Samvid International (Science & Technology Group) आणि Water Experts Network (WEN) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत देशभरातील १०० हून अधिक सामाजिक संस्था नटराज निकेतनसोबत सहभागी होऊन कार्य करणार आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचाच सहभाग महत्त्वाचा-

पर्यावरणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. आपल्या कृतींमधून काही प्रमाणात प्रदूषण होत असल्याने ते रोखण्यासाठीही नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, अशी संस्थेची भूमिका आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ संस्थेपुरती मर्यादित न ठेवता नागरिकांच्या सक्रिय सहभागातून राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेची संकल्पना जलतज्ज्ञ मुकुंद पात्रीकर यांची असून, त्यांच्यासह अनेक वरिष्ठ जलतज्ज्ञांचे मार्गदर्शन या उपक्रमाला मिळणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा मंगला ताई पात्रीकर यांनी नागरिकांना या सेवाकार्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

जलसुरक्षा आणि शाश्वत विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये आणि उपलब्ध जलसाठे सुरक्षित राहावेत, यासाठी आतापासूनच सामूहिक प्रयत्न करण्याची गरज या मोहिमेच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला नटराज निकेतन संस्थेच्या अध्यक्षा मंगला ताई पात्रीकर, सचिव मुकुंद पात्रीकर, कोषाध्यक्ष मधुरा व्यास, जलतज्ज्ञ योगेश मुरकुटे, हर्षदा पात्रीकर, निखिल व्यास, मिलिंद सोमण, नंदिनी चौहान आणि डॉ. भावना सलामे उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.