Published On : Fri, May 22nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ‘ऑपरेशन थंडर प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्याचा साठा जप्त; एका आरोपीला अटक

नागपूर – शहरातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याच्या अवैध व्यापाराविरोधात अजनी पोलिसांनी “ऑपरेशन थंडर” अंतर्गत मोठी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मे 2026 रोजी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीदरम्यान पोलिस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. एका व्यक्तीकडून अ‍ॅक्टिव्हा वाहनाद्वारे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी ओंकार नगर चौक परिसरात आणला जाणार असल्याची माहिती मिळाली होती.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीच्या आधारे पोलिसांनी ओंकार नगर येथील “द केक झोन” दुकानासमोर सापळा रचला. काही वेळात संशयित व्यक्ती तेथे आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. चौकशीत आरोपीने हा माल आपल्या घरातून आणल्याची कबुली दिली.

यानंतर पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत आरोपीच्या घरी संयुक्त छापा टाकला. या कारवाईत घरातून मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रमोद रामेश्वर तितरे (वय 59), रा. निरंजन नगर, बेलतरोडी, नागपूर असे आहे. पोलिसांनी आरोपीकडून 85.703 किलो प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, अ‍ॅक्टिव्हा वाहन आणि मोबाईल फोनसह एकूण 1 लाख 99 हजार 792 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किरण रंगस्वामी गेडाम यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 59 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींदर कुमार सिंगल, सह पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलिस आयुक्त शिवाजी राठोड, पोलिस उपायुक्त रश्मिता राव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार, पोलिस निरीक्षक प्रभाकर कवाले, उपनिरीक्षक सिद्धांत मस्के आणि अजनी पोलिसांच्या पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या सलग कारवायांमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement