नागपूर:नागपूरमध्ये ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकाने मानकापूर परिसरात धडक कारवाई करत मोठा ड्रग्ज साठा उघडकीस आणला आहे. राज अपार्टमेंटसमोर, इलेक्शन हॉस्पिटलच्या मागे पोलिसांनी पहाटेच्या सुमारास छापा टाकून तिघा संशयितांना पकडले.
या कारवाईत पोलिसांनी 52 ग्रॅम एमडी पावडर, तीन मोबाईल, एक महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक एक्टिवा मोपेड असा एकूण 16 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये नबाब तोही जमशेद खान (वय 31), आयुष अमृत मेश्राम (वय 21)आणि रोहित रवींद्र सिंग(वय 26) यांचा समावेश आहे. तर त्यांचा चौथा साथीदार शहाणा वाजे उर्फ पक्या मोहम्मद आरिफ हा फरार असून पोलिस त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.
गस्ती दरम्यान पोलिसांना हे युवक त्यांच्या वाहनाजवळ संशयास्पद हालचाल करताना दिसले. तात्काळ पंचांच्या उपस्थितीत झडती घेतल्यावर त्यांच्या ताब्यातून अंमली पदार्थ सापडले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून NDPS कायद्यानुसार गुन्हा नोंदवला.
या कारवाईमुळे नागपूर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला आणखी वेग आला असून, शहरातील ड्रग्ज नेटवर्कचा मोठा धागा हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










