Published On : Fri, Jul 13th, 2018

जयभवानी साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत दोन महिन्यात कार्यवाही – सहकार मंत्री सुभाष देशमुख

नागपूर : जयभवानी सहकारी साखर कारखाना, ता.गेवराई, जि.बीड येथील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत संबंधितांसोबत बैठक घेऊन दोन महिन्यात कार्यवाही केली जाईल, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

येथील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असून त्याबाबत गृह विभागामार्फत सविस्तर चौकशी सुरु आहे तसेच कारखान्याकडून त्यांच्या कुटुंबास रक्कम दिली असल्याची माहिती त्यांनी दिली. आत्महत्येमुळे कुटुंबास मिळणाऱ्या शासकीय मदतीसंदर्भात या कुटुंबास ती मिळाली की नाही, याचीही चौकशी केली जाईल, असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.

सदस्य सर्वश्री लक्ष्मण पवार, अजित पवार, जयंत पाटील, योगेश सागर यांनीही यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.