नाणार प्रकल्प लादला जाणार नाही सर्व संमतीने तोडगा काढू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharsahtra CM Devendra Fadnavis

नागपूर : नाणार जि. रत्नागिरी येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिक, सहकारी पक्ष, विरोधी पक्ष सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन समन्वयाने चर्चा करुनच याबाबत तोडगा काढला जाईल. हा प्रकल्प लादला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाच्या इंधन सुरक्षेसाठी केंद्र सरकारने सागरी किनार पट्टीवर मेगा रिफायनरी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात, महाराष्ट्र व आंध्रप्रदेश राज्याने या रिफायनरीसाठी मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्राला हा प्रकल्प मिळाला. तीन लाख कोटी रुपये गुंतवणूक व एक लाख रोजगार निर्माण करणारा हा प्रकल्प आहे.

हा प्रकल्प ग्रिन रिफायनरी असून यासाठी उच्च प्रतीचे तंत्रज्ञान आहे. सिंगापूर येथे असाच प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे प्रदूषण होत नाही. जगात अनेक देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रिफायनरी उभारल्या जात आहेत.

नाणार येथील स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना यांना या प्रकल्पाबाबत प्रदूषण व अन्य बाबींविषयी शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यासाठी तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आयआयटी पवई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केली आहे.

या संस्थांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि स्थानिक जनतेच्या शंका दूर झाल्याशिवाय नाणार प्रकल्पाचे काम सुरु करणार नाही. विरोध होत असेल त्या ठिकाणी प्रकल्प लादायचा नाही, असे शासनाचे धोरण आहे. यासाठी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाईल, लोकांना नाणार प्रकल्प पटेल तेव्हाच निर्णय घेऊ. अत्यंत समन्वयाने चर्चा करु. लोकांचे प्रश्न, शंका याबाबत त्यांना सादरीकरणाद्वारे माहिती देवू, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.