Published On : Fri, Jul 13th, 2018

राज्यातील विद्युत खांब, तार व यंत्रणा दुरुस्तीसाठी 7 हजार 300 कोटींचा आराखडा – ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

C Bawankule

नागपूर : राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही, त्याकरिता 7 हजार 300 कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

ऊर्जा मंत्री म्हणाले, यासाठी विभागाने राज्यात 21 हजार अपघात प्रवण क्षेत्र निवडले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्यात येईल, त्यामुळे अपघात होऊन होणारी प्राणहानी, वित्तहानी टाळता येऊ शकेल. विद्युत अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबास चार लाख रुपये मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे दिले जातात.

तसेच जखमी व्यक्तींना त्यांच्या औषधोपचार व दवाखान्याचा संपूर्ण खर्च दिला जातो. राज्यातील ग्रामीण भागात याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकाच्या स्वाक्षरी ऐवजी ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुखाची स्वाक्षरी बिलांवर चालू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबास सात दिवसात मदतीचा धनादेश व जखमींबाबत तीन महिन्यांत दवाखान्याच्या खर्चाची रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही केली जाईल. वेळेचा उपव्यय टाळण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवरील प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी विभागीय संचालकांना अधिकार दिले आहेत, असे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

शाखा अभियंता निलंबित
मौजे रोहकल, ता.खेड, जि.पुणे येथे 19 मे 2018 रोजी 22 केव्ही उच्च दाब उपरी तार मार्गातील वाय फेसचा विद्युत भारीत वाहक तुटून अपघात झाला. यात विशाल काचोळे व त्याच्या मातोश्री जखमी झाल्या यासंदर्भात संबधित शाखा अभियंत्यास निलंबित केले असल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले. तसेच संबधित जखमी व्यक्तींच्या औषधोपचाराचा 1 लाख 55 हजार रुपयांचा खर्च तातडीने देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सदस्य सर्वश्री सुरेश गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, बच्चू कडू, बाळासाहेब थोरात यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.