Published On : Fri, Aug 2nd, 2019

शेतकर्‍यांसाठी आमच्या तिजोरीची दारे उघडी : मुख्यमंत्री

Advertisement

नागपूर: गेल्या 5 वर्षात राज्यातील शेतकर्‍याला 50 हजार कोटींची थेट मदत करणारे आमचे सरकार असून बोंडअळी, संत्रावरील संकट, दुष्काळ असे कोणतेही संकट आले तरी शेतकर्‍यांसाठी आमच्या तिजोरीची दारे उघडी आहेत. शेतकर्‍याला लागेल ती मदत करून पुन्हा उभे करण्याचे काम आमचे सरकार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काटोल येथील जाहीर सभेत हजारो नागरिकांच्या उपस्थितीत दिली.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधीर पारवे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, चरणसिंग ठाकूर, नगराध्यक्ष सौ. वैशाली ठाकूर, आ. सुजितसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, अविनाश खळतकर, विकास तोतडे, संदीप सरोदे, भोलानाथ सहारे, प्रेरणा बारोकर, अर्चना डेहनकर, अविनाश ठाकरे, सुभाष जयस्वाल, श्यामराव बारई, मनोज कोरडे, आदी उपस्थित होते.

मागील पाच वर्षात या शासनाने काय काम केले याचा लेखाजोखा आपल्या समोर ठेवून पुन्हा आपले आशीर्वाद, महाजनादेश मागण्यासाठी मी आलो असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- मागच्या वेळी आपण आम्हाला जनादेश दिला. पण तुमच्या जनादेशाचा अपमान करून येथील लोकप्रतिनिधी पळून गेला. मात्र आता असे होणार नाही. यावेळी पुन्हा आशीर्वाद द्या. तुमची प्रतारणा होणार नाही, याची खात्री मी देतो असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले- जिसने छोडा मोदीजीं का साथ उसका हुआ सत्यानाश. मुख्यमंत्र्यांनी शासनाने घेतलेल्या सर्व कामांची जंत्री लोकांसमोर ठेवली. सिंचन, रस्ते, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन, दुष्काळ, कर्जमाफी, गरिबांसाठ़ी घरे अशा सर्व योजनांतून राज्य शासनाने गरिबांना आणि सामान्य नागरिकांना मदत केली आहे. हे सरकारच गरीब आणि सामान्य माणसाचे आहे. पाच वर्षात आम्ही आमच्यासाठी काही नाही तर जनतेसाठी केले आहे. त्यामुळे पुन्हा भाजपाला, मला, नितीन गडकरींना, बावनकुळे यांना आपला भरभरून आशीर्वाद द्या असे आवाहनही त्यांनी केले.

भारनियमनमुक्त राज्य : पालकमंत्री बावनकुळे
सन 2012 पर्यंत भारनियमन मुक्त राज्य करण्याचे पोकळ आश्वासन देणार्‍यांनी राज्य भारनियमनमुक्त केले नाही. मात्र विद्यमान राज्य शासनाने मात्र हे करून दाखविले. आज राज्यात कुठेही भारनयमन नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. फडणवीस यांच्या नेतृत्वातील शासनानेच पालकमंत्र्यांचे अधिकार वाढवून 772 कोटींचे केले. त्यामुळेच काटोलला 125 कोटी रुपये मिळू शकले. 5 लाखावर शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना वीज कनेक्शन देऊन बॅकलॉग दूर करण्याचे काम याच शासनाने केले आणि आताता 2.18 लाख शेतकर्‍यांना उच्च दाब विद्युत प्रणालीच्या माध्यामातून कनेक्शन देण्यात येत आहे.

30 हजार कोटी वीज बिलाची थकबाकी शेतकर्‍यांकडे असूनही एकाही शेतकर्‍याचे कनेक्शन न कापणारे हे शासन आहे. खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आम्ही बजावली असून यापुढेही शेतकर्‍यांच्या पाठीशी हे शासन उभे राहणार आहे. 2011 पूर्वीच्या शेतमजुरांना व बेघरांना पट्टेवाटपाचा महत्त्वाचा निर्णयही याच शासनाने घेतला असल्याचेही पालकमंत्र्यांनी उपस्थित हजारो नागरिकांना सांगितले.

यापूर्वी डॉ. राजीव पोतदार, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. काटोलच्या तालुका क्रीडा संकुलात झालेल्या या जाहीरसभेला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

सावनेर जाहीरसभा
सावनेर येथील नगर परिषद हायस्कूलच्या मैदानात झालेल्या जाहीरसभेलाही भरपावसात हजारों नागरिकांनी हजेरी लावली होती. या सभेला व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधीर पारवे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. सुजितसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, भाजपाचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, रमेश मानकर, अशोक धोटे, सोनबा मुसळे, दादाराव मंगळे, प्रकाश टेकाडे, दिलीप जाधव, राजेश जीवतोडे,रेखाा मोवाडे, स्मृती इखार, रामराव मोवाडे, देविदास मदनकर, मीनाताई तायवाडे, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, अविनाश खळतकर, विकास तोतडे, आदी उपस्थित होते.

सावनेर येथील जाहीरसभेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या सर्व योजना व सावनेर तालुक्यासाठ़ी केलेल्या कामांचा आढावा घेत यावेळी भाजपाच्या उमेदवाराला महाजनादेश देण्याचे आवाहन नागरिकांना केले.