Published On : Mon, Jul 6th, 2020

‘स्मार्ट सिटी’च्या अनियमिततेवर खुल्या चर्चेस तयार!

महापौर संदीप जोशी यांचे थेट पालकमंत्र्यांना आव्हान : मुंढेंची पाठराखण करण्यास घेतली हरकत

नागपूर: स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून चेअरमन प्रवीण परदेशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना अधिकार दिले. त्या अधिकारातून त्यांनी काही देणी दिली असेल तर त्यांचे त्यात चुकले काय, असे म्हणत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली. यावर हरकत घेत, पालकमंत्री यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असे वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. या विषयावर त्यांच्यासोबत कुठेही आणि कधीही आपण खुल्या चर्चेस तयार आहोत, त्यांनी फक्त दिवस सांगावा, असे थेट आव्हान महापौर संदीप जोशी यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना दिले आहे.

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या सीईओ पदावरून महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद शिगेला पोचला आहे. याच पार्श्वभूमीवर १० जुलै रोजी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. दरम्यान पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाची प्रशंसा करीत स्मार्ट सिटीच्या विषयात त्यांची पाठराखण केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतःहून काहीही केलेले नाही. चेअरमन यांनी अधिकार दिल्यानंतर त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पालाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. जर कुठल्या कंपनीचे देणी दिले असतील तर त्यांना मिळालेल्या अधिकारातून दिले, असे वक्तव्य करीत महापौर आणि आयुक्तांच्या वादात उडी घेतली.


पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या या वक्तव्यावर महापौर संदीप जोशी यांनी आक्षेप घेत काहीही न बोलता थेट खुल्या चर्चेचे आव्हानच दिले आहे. ना. राऊत यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे असली बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. सीईओचे अधिकार त्यांना कोणत्या कायद्याखाली अथवा नियमाखाली मिळाले हे आतापर्यंत खुद्द आयुक्त तुकाराम मुंढे सिद्ध करवून दाखवू शकले नाही.

आपण जर असे वक्तव्य करीत असाल तर किमान आपण ते सिद्ध करून दाखवावे, असेही महापौर संदीप जोशी यांनी म्हटले आहे. अधिकार नसताना बँकेची दिशाभूल करून २० कोटींची देणी देणे, हा गैरप्रकारच आहे. आपण हे अगदी जबाबदारीने आणि पुराव्यांसह बोलत आहोत. आपण माझे बोलणे खोटे ठरविण्यासाठी खुली चर्चा घडवून आणावी, आपण कुठल्याही चर्चेस तयार आहोत. जेथे आयुक्तांनी चांगले कार्य केले तेथे आम्ही आजही त्यांच्या पाठीशी आहोत. मात्र जेथे चुकले तेथे क्षमा नाही. आम्ही आरोप केला. तो सिद्ध होईल. तत्पूर्वी त्यांना ‘क्लीन चीट’ देण्याचा प्रकार आपल्या अंगलट येऊ शकतो, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना दिला आहे.