Published On : Wed, Mar 3rd, 2021

कोव्हिड लसीकरणासाठी गुरूवारपासून झोन कार्यालयात ऑनलाईन नोंदणी व्यवस्था

महापौर दयाशंकर तिवारी यांचे निर्देश : लसीकरणात ऑनलाईन नोंदणीला प्राथमिकता

नागपूर : कोव्हिड लसीकरणासाठी लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी ही धोक्याची आहे. ही गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांची गैरसोय होउ नये, यासाठी उद्या गुरूवार (४ मार्च)पासून प्रत्येक झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांना स्वत: घरून लसीकरणासाठी नोंदणी करणे शक्य आहे त्यांना कुठेही जाण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांकरिता मनपातर्फे विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही पूर्ण करून गुरूवारी दुपारी १२ वाजता व त्यानंतर दररोज १०.३० ते १२.३० या वेळेत ऑनलाईन नोंदणी काउंटर सुरू ठेवण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. महापौरांना दररोज तक्रार भेटत होती की लसीकरण केन्द्रांमध्ये मोठी रांग असल्यामुळे त्यांना गैरसोय होत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करण्यात अडचण होत होती. या समस्याचे निराकरण करण्यासाठी महापौरांनी अशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

कोव्हिड लसीकरणासंदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता.३) महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांच्या कक्षात बैठक घेतली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक प्रकाश भोयर, लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धंतोली झोन सभापती वंदना भगत, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे आदी उपस्थित होते. महापौरांनी सगळया प्रभाग समिती सभापतींना या व्यवस्थेचा दररोज आढावा घेण्याचेही निर्देश दिले आहे.

कोव्हिड लसीकरण केंद्रांवर नोंदणी झालेल्यांना वेळेवर लस मिळू शकत नाही, याबाबत योग्य नियोजन करण्याचेही यावेळी महापौरांनी निर्देशित केले. लसीकरणासाठी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन नोंदणीही सुरू आहे. मात्र ऑनलाईन नोंदणीला प्राधान्य देउन ऑफलाईन पद्धतीने रोज प्रत्येक केंद्रासाठी केवळ २५ लोंकांनाच परवानगी देण्यात यावी. यानंतर येणा-या व्यक्तींना पुढील तारखेचे टोकन देण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

लसीकरण केंद्रावर नागरिकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. लसीकरण स्थळी प्रसाधनगृहाची व्यवस्था असावी, नसल्यास फिरते प्रसाधनगृह उभारावे व त्याची योग्य स्वच्छता राहिल यासाठी स्वच्छता झोनल अधिका-यांची जबाबदारी निश्चित करावी. यासोबतच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी. विशेष म्हणजे, या सर्व बाबींची माहिती देणारे फलक लावण्यात यावे. याशिवाय नोंदणी कक्ष, प्रतिक्षालय, लसीकरण कक्ष यासह लसीकरणासाठी शासनाद्वारे आरक्षित व्यक्ती कोण, कोणाला प्राधान्य आहे, यासर्वांच्या माहितीच्या फलकांसह कोव्हिड संदर्भात नियमांचे फलक व आवश्यक संपर्क क्रमांकही लसीकरण केंद्रावर प्रदर्शित करणे. तसेच लसीकरण केंद्र दररोज निर्जंतुकीकरण करणे आठवड्यातून एकदा त्या ठिकाणी फवारणी करणे आदीबाबत स्पष्ट निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच लसीकरण केन्द्रात दररोज सॅनीटाईजरची व्यवस्था करण्याचेसुध्दा निर्देश दिले.

खाजगी रुग्णालयामधील लसीकरण केंद्र सुरू
११ शासकीय कोव्हिड लसीकरण केंद्रासह बुधवारी (ता.३) मनपाच्या केटी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. यासोबतच शहरातील नोंदणी झालेल्या खाजगी लसीकरण केंद्रांवर उद्या गुरूवार (४ मार्च)पासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. यासाठी लस घेउ इच्छिणा-यांना २५० रूपये शुल्क भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, शासकीय व खाजगी केंद्र यापैकी कुठे लसीकरण करून घ्यावयाचे आहे, याची पसंती लाभार्थ्यांना करता येईल. यासाठी ऑनलाईनपद्धतीने नोंदणीला प्राधान्य देण्यात आले आहे. ऑफलाईन पद्धतीने २५ जणांनाच प्राधान्य असेल.

नागपूर शहरातील रेडियन्स हॉस्पीटल, वर्धमाननगर, न्यू ईरा हॉस्पीटल, वर्धमाननगर, व्हिम्स हॉस्पीटल, कामठी रोड, अर्नेजा हॉस्पीटल, बारस्कर हॉस्पीटल, सुश्रुत हॉस्पीटल, रामदासपेठ, सेंटर पॉईंट हॉस्पीटल मेडीकल चौक, क्यूअरईट हॉस्पीटल दिघोरी चौक, होप हॉस्पीटल, केशव हॉस्पीटल, मानेवाडा, मेडिकेअर हॉस्पीटल मानकापूर चौक, कुणाल हॉस्पीटल, छिंदवाडा रोड, आयकॉन हॉस्पीटल, अमरावती रोड या रुग्णालयांमध्ये गुरूवारपासून लसीकरण घेता येणार आहे.