मुंबई– राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सकाळी ११ वाजल्यापासून संकेतस्थळावर नोंदणी आणि कॉलेज पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशीच संकेतस्थळावर तांत्रिक अडथळे निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संकेतस्थळ वारंवार डाऊन, माहिती सेव्ह होईना
mahafyjcadmissions.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जणांना लॉगिन होण्यात अडचण येत आहे, तर अनेक ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. परिणामी, ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा पहिला टप्पाच रखडला आहे.
राज्यभरातील विद्यार्थ्यांना एकाच पोर्टलवर प्रवेशाची संधी
यंदा प्रथमच अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राज्यभरात एकाच पोर्टलवर एकत्रितपणे राबवण्यात येत आहे. यामुळे कोणत्याही शहरातील विद्यार्थी राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये अर्ज करू शकतात. पण या केंद्रीकृत प्रणालीच्या पहिल्याच दिवशीच संकेतस्थळ तांत्रिक अडथळ्यांमुळे कोलमडल्याने शिक्षण विभागाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू
या तांत्रिक समस्येबाबत शिक्षण संचालनालयाकडून माहिती देण्यात आली असून, प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच सर्व अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी सुलभ सेवा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
प्रवेश प्रक्रियेचा पुढील कालावधी
२१ ते २८ मे: नोंदणी आणि कॉलेज पसंतीक्रम भरणे
३० मे: तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध
३० मे ते १ जून: हरकती आणि सुधारणा
३ जून: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर
५ जून: गुणवत्ता यादीनुसार पहिल्या फेरीचे प्रवेश वाटप
६ ते १२ जून: विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश पूर्ण करता येईल
१४ जून: दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर