Published On : Thu, Sep 14th, 2017

बंदीजन शेतकऱ्यांनी भरले ऑनलाईन कर्जमाफीचे अर्ज

Advertisement

नागपुर: मध्यवर्ती कारागृहातील शेतकरी असलेल्या बंदीजनांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी केलेल्या विनंतीनुसार जेल प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेवून सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून तसेच जिल्हा प्रशासनाने 14 बंदीजनांचे कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरुन घेतले आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग बंदीजनांनाही सूलभ झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा महत्वकांक्षी निर्णय शासनाने घेतला असून या योजनेचा लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांचेकडे अर्ज केला होता. बंदीजनांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ता गजनान इंगळे यांच्या सहाय्याने कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या बंदीजनांकडून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेल्या आधारकार्डासह इतर माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून गोळा करण्यात आली.

कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी मध्यवर्ती कारागृहातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गडचिरोली जिल्हयातील बंदीजनांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनुसार सामाजिक कार्यकर्ते गजानन इंगळे यांनी आधारकार्ड, तसेच इतर कागदपत्र गोळा करण्यासाठी बंदीजन व त्यांच्या नातेवाईकांकडे कारागृहाच्या वतीने संपर्क केला. त्यापैकी आधारकार्ड वरील बॉयोमेट्रीक नोंदणीनुसार पुष्ठी करताना विसंगती तसेच काही बंदीजनांकडे आवश्यक दस्ताऐवज उपलब्ध झाले नाही. त्यापैकी 14 बंदीजनांचे आधार क्रमांकासह ऑनलाईन नोंदणीसाठी पात्रता योग्य असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात आली.

शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले असता जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी तहसिलदार तसेच आपले सरकार सेवाकेंद्राच्या चमूला मध्यवर्ती कारागृहामध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक बॉयोमेट्रीक यंत्रासह कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या बंदीजनांकडून ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. कर्जमाफीच्या नोंदणीनंतर युजर आयडी व पार्सवर्ड तयार झाल्यामुळे बंदीजनांच्या कुटूंबांनी आता त्यांच्या गावातील संग्राम केंद्रात अथवा आपले सरकार सेवाकेंद्रा जावून ऑनलाईन फार्म भरणे सूलभ झाले आहे.

कर्जमाफीसाठी मिळण्यासाठी 15 सप्टेंबर ही शेवट तारीख असल्यामुळे बंदीजनांच्या कुटूंबांना त्यांच्या गावातील नोंदणी केंद्रामध्ये जावून कर्जमाफीचा अर्ज भरण्यासाठी सुध्दा मार्गदर्शन करण्यात आले आहे. आपले सरकार या सेवाकेंद्राचे जिल्हा समन्यक उमेश घुगुसकर, आनंद पटले यांनी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था केली. विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ता गजानन इंगळे यांनी कर्जमाफीसाठी विनंती केलेल्या सर्व कैदयांना भेटून त्यांचेकडून आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासोबतच आधार नंबर घेण्यासाठी संबंधित बंदीजनांच्या गावी संपर्क करुन आधार क्रमांक मिळविले.

कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक सुनिल निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी श्री. गावित, श्री. मिराशे, श्री. पाटील गुरुजी, श्री. हतवादे गुरुजी तसेच सामाजिक कार्यकर्ता गजानान इंगळे यांनी विशेष सहकार्य केले. मध्यवर्ती कारागृह व जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकाराने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून शेतकरी वंचित राहणार नाही. या शासनाच्या भूमिकेनुसार बंदीजन असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.