Published On : Thu, Sep 14th, 2017

कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मेळाव्याला पाच हजार युवकांचा सहभाग

नागपूर: बेरोजगार युवक व युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच कौशल्य विकास, तसेच उद्योजकता मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यास पाच हजार युवकांनी उपस्थित राहून स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकासाच्या टिपस घेतल्यास यासाठी विभागातील 15 मोठ्या कंपन्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच या मेळाव्यात उद्योजकतातर्फे 2 हजार 200 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे जिल्हयातील बेरोजगार युवकांसाठी मौदा येथील रुखमनी सभागृहात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी अविनाश कातडे, सहायक संचालक प्रविण खंडारे, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी शैलेश भगत, तहसिलदार चंद्रभान खंडाईत, गटविकास अधिकारी श्री. कणसे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मस्के यावेळी उपस्थित होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे आयोजित या मेळाव्यासाठी नामांकित कंपन्यांमध्ये आदित्य बिरला, पीएनबी इन्शुरन्स, रिलायन्स मिडकॉन, युरिका फोर्ब, इनेवेटिव्ह टेक्सटाईल, मोरारजी टेक्सटाईल, इंडोरामा, सीएट, महिन्द्रा अण्ड महिन्द्रा, विशाख इंडस्ट्रीज, तसेच आदित्य बिरला स्कील फाऊंडेशन, तसेच विविध हॉस्पीटल आदी उद्योजकांनी बेरोजगार युवकांची नोकरी संदर्भात मार्गदर्शन केले. या मेळाव्यातील अडीच हजार बेरोजगार उमेदवारापैकी 2 हजार 200 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.

=नागपूर ग्रामीण भागात पहिल्यादांच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक प्रविण खंडारे यांनी प्रास्ताविकात जिल्हयात सरासरी 80 हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांना कौशल्य विकासाचे मार्गदर्शन करण्यात येणार असे सांगितले.

रोजगार युक्त महाराष्ट्र संकल्पनेनुसार जिल्हयात कौशल्य विकास कार्यक्रमासाठी तीन कोटी रुपये खर्चाचा आराखडा जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करण्यात येत असल्याचे श्री. खंडाईत यांनी यावेळी सांगितले. उपविभागीय महसूल अधिकारी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.