Published On : Sat, Aug 19th, 2017

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात वीजबिल भरण्याची ‘ऑनलाईन’ भरारी

Maha-vitran

नागपूर: दरमहा सरासरी 70-72 कोटी रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा करणार्‍या महावितरणच्या नागपूर प्रादेशिक परिक्षेत्रातील वीजग्राहकांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. गेल्या जुलै महिन्यात 4 लाख 15 हजार 395 ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 73 कोटी 22 लाख रुपयांचा घसबसल्या ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे.

नागपूर प्रादेशिक परिक्षेत्रातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणि गोंदीया परिमंडलात गेल्या तीन महिन्यांत ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणार्‍या वीजग्राहकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढलेली आहे. गेल्या जुलै महिन्यात तब्बल 4 लाख 15 हजार 395 वीजग्राहकांनी 73 कोटी 22 लाख 84 हजार 40 रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यात नागपूर परिमंडलातील 1 लाख 36 हजार 641 वीजग्राहकांनी 28 कोटी 28 लाख 51 हजार 420 तर अकोला परिमंडलातील 1 लाख 8 हजार 81 ग्राहकांनी 16 कोटी 36 लाख 57 हजार 610 रुपयांचा ‘ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. तसेच अमरावती परिमंडलातील 69 हजार 693 ग्राहकांनी 12 कोटी 66 लाख 62 हजार 790, चंद्रपूर परिमंडलातील 55 हजार 296 ग्राहकांनी 8 कोटी 92 लाख 53 हजार 770, तर गोंदीया परिमंडलातील 45 हजार 684 ग्राहकांनी 7 कोटी 1 लाख 58 हजार 450, रुपयांचा ‘ऑनलाईन’ भरणा केलेला आहे.

मागील आर्थिक वर्षी दरमहा 60 ते 65 कोटी रुपयांचा सरासरी ‘ऑनलाईन’ भरणा आता गेल्या जुलै महिन्यात 73 कोटींवर गेला आहे. यासोबतच मागील आर्थिक वर्षात सरासरी साडेतीन ते चार लाख दरम्यान असलेली ग्राहकसंख्याही गेल्या तीन महिन्यात सरासरी 4 लाखापेक्षा अधिक झालेली आहे. महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in या वेबसाईटद्वारे सोय उपलब्ध करून दिलेली आहे. जून 2016 मध्ये वीजग्राहकांसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. या अ‍ॅपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे रांगेत उभे राहण्याऐवजी महावितरणच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपवरून वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणे केले आहे.