नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील दुर्बल घटक समितीची बैठक सभापती महेंद्र धनविजय यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी (ता. १८) पार पडली.
मागासवर्गीयांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांवरील खर्च योग्य प्रकारे होतो अथवा नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी मागासवर्गीय प्रवर्गातील नगरसेवकांचा समावेश असलेली दुर्बल घटक समितीचे गठन करण्यात आले आहे. याच समितीच्या शुक्रवारच्या सभेत मागील काही वर्षात समितीच्या अधिकारकक्षेत असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीला समितीचे सभापती महेंद्र धनविजय, सदस्य नागेश मानकर, शकुंतला पारवे, अनिल गेंडरे, लिला हाथीबेड, निरंजना पाटील, शिल्पा धोटे, परसराम मानवटकर, जितेंद्र घोडेस्वार यांच्यासह कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, उपअभियंता (स्लम) कमलेश चव्हाण, लकडगंज झोनचे उपअभियंता राजेश ठोंबरे आणि समाजकल्याण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांनी समितीच्या अधिकारात असलेल्या निधीची माहिती दिली. समितीच्या अधिकारात यापूर्वी झालेली कामे आणि सध्या सुरू असलेल्या कामांचा माहिती समिती सदस्यांना दिली.
समितीच्या अधिकारात विकासकामांसाठी असलेला निधी मंजुरीचे अधिकार सभापतींना देण्याचा ठराव समिती सदस्य नागेश मानकर यांनी मांडला. या प्रस्तावाला उपस्थित सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले.
यापुढे समितीच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये कामे प्रस्तावित करण्यापूर्वी संबंधित जागेचे निरीक्षण सभापती आणि समिती सदस्य करतील. त्यानंतरच कामांना मंजुरी दिली जाईल, असे निर्देश सभापती महेंद्रप्रसाद धनविजय यांनी दिले.