Published On : Wed, Nov 18th, 2020

एक कार्यकर्ता १० मतदार या ध्येयाने कार्य करा : मेश्राम

– संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ता बैठक

नागपूर. पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे भारतीय जनता पार्टी, बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप युतीचे अधिकृत उमेदवार नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. या बैठकीत एक कार्यकर्ता १० मतदार हे लक्ष ठेवून कार्य करण्याचे आवाहन भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी कार्यकर्त्यांना केले.

Advertisement

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे शहर अध्यक्ष राजेश हाथीबेड होते. यावेळी अशोक मेंढे, माजी आमदार डॉ. मिलींद माने, सुभाष पारधी, सतीश शिरसवान, नगरसेवक संजय बंगाले, रामभाऊ आंबुलकर, ॲड. राहूल झांबरे, नगरसेवक संदीप गवई, जयसिंग कच्छवाह, नगरसेविका उषाताई पॅलेट, नगरसेवक अनिल गेंडरे, शंकर मेश्राम, अजय करोसिया, संदीप बेले, इंद्रजीत वासनिक, सुनील वाहने, केडकर काका, संघपाल कडे, चंद्रशेखर केडझरे, नेताजी गजभिये, दिलीप गोईकर, प्रकाश चमके, प्रदीप महतो, गोविंद खरे, सुनील तांबे, राजू चौहान, शशीकला बावणे, सुभाष बोरकर, सुनील हरडे, निरंजन दहिवले, रोहन चांदेकर, राम भीलकर आदी उपस्थित होते.

Advertisement

पदवीधर मतदार संघ निवडणूक ही भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठेची निवडणूक आहे. मागील ५० वर्षात पक्षाने कायम ठेवलेला झेंडा यावेळीही तसाच अभिमानाने फडकत राहिल यामध्ये काहीही शंका नाही. तरुणाईची, पदवीधरांची, बेरोजगारांच्या प्रश्नांची जाण असलेला संवेदनशील मनाचा एक योग्य उमेदवार पक्षाने पदवीधरांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिला आहे. पदवीधरांचा खरा हक्कदार निश्चितच विधानपरिषदेत बसला पाहिजे यासाठी आपण प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेहमीच आम्हाला हिणवले जाते मात्र या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये प्रत्येक अडचणींना धीराने सामोरे जाण्याची आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची क्षमता आहे. त्यामुळे या पदवीधरांच्या निवडणुकीमध्ये त्याच जोमाने कार्य करून एक कार्यकर्ता १० मतदार हे लक्ष ठेवून पक्षाच्या विजयात आपले योगदान द्या, असेही आवाहन भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून विदर्भाकडे दुर्लक्ष करीत आहे. २८ सप्टेंबर १९५३ला नागपूर करार झाला. या नागपूर करारानुसार दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हायचे. मात्र यावर्षी कोरोनाचे कारण दाखवून या सरकारने ते सुद्धा मुंबईतच घेण्याचा निर्णय घेतला.

यंदा पावसाळ्यात पूर परिस्थितीमुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. वर्षाची मेहनत पाण्यात बुडाली. अशा स्थितीत सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे उद्धव ठाकरे बांधावर जाणे दूरच पूलावरूनही पाणी पाहायला आले नाहीत. दुसरीकडे ८० वर्षाचा योद्धा शरद पवारही कुठेच फिरकले नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरी जाण असलेला आमचा नेता मात्र शेतक-यांच्या बांधावर पोहोचला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायपीट करीत शेतक-यांच्या शेतात जावे लागले, त्यांना सहानुभूती द्यावी लागली. ही या सरकारची स्थिती आहे.

एवढेच नव्हे तर ८०० कोटीची डीपीसी ही माजी ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यकाळात नागपूर शहरात देण्यात आली होती. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ती डीपीसी ४०० कोटी पर्यंत खाली खेचण्याचे कार्य करण्यात आले. ४०० कोटी बाजूलाच ठेवले तर १२९ कोटी रूपये राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या विकासासाठी देउन या शहरातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम या सरकारने केले आहे.

या महाविकास आघाडीतील पक्षांच्या वतीने नेहमीच जातीचे, धर्माचे, पंथाचे, भाषेचे विषयच पुढे घेउन लढाया लढल्या आहेत. एकीकडे फुले, शाहु, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र म्हणून सांगायचा, बाबासाहेब आमचे दैवत आहेत हे सांगत सुटायचं आणि दुसरीकडे याच सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याच्या जवळची व्यक्ती काटोलमध्ये अरविंद बन्सोड नामक तरुणाची हत्या करतो. जालण्याच्या पाणशेंदा येथे दोन दलितांची हत्या केली जाते. अमरावती जिल्ह्यातील धारणीमध्ये एका महिलेवर बलात्कार होतो आणि तेथील पालकमंत्री असलेल्या राज्यातील महिला व बालकल्याण मंत्री एक शब्दही बोलायला तयार नाहीत. काँग्रेसचा दोनदा नगरसेवक असलेल्या दलित व्यक्तीची भरदिवसा हत्या केली जाते, त्यावरही उत्तरप्रदेशच्या दलितांसाठी धावून जाणारे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मूग गिळून आहेत, असा घणाघातही ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.

भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करताना अनेकदा जातीय दाखले देत अनेकदा हिणवण्यात येते. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळात ॲस्ट्रॉसिटीच्या घटनांची संख्या अगदीच नगण्य होती. भाजपनेच दीक्षाभूमीला पर्यटनाचा ‘अ’ दर्जा दिला, आम्हीच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची महापरिनिर्वाण भूमी १९ कोटी रूपयांना खरेदी करून या देशाला समर्पित केली. आम्हीच बाबासाहेबांचा लंडनमधील बंगला खरेदी करून तो सर्वांसाठी खुला केला. अशी अनेक कामे भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहेत.

जातीचा दाखला देत अनेक आरोप आधीपासून होत आलेली आहे. असे आरोप पुढेही होतील आणि विरोधकांकडून ती होतच राहतील. या अशा आरोपांना उत्तर देण्याची क्षमता आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे. आमचा कार्यकर्ता हा नेक असावा, तो बहाद्दर असावा व तो शंभरांना पुरणारा असावा. असे अनेक कार्यकर्ते आजपर्यंत पक्षाने घडविण्याचे कार्य केले आहे. भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सर्वांना पुरून उरणारा आहे, सर्व प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे हे सांगताना अभिमान वाटतो, असेही भाजप प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement