नागपूर – शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेकडी येथील आजाद नगरमधील मटन गल्लीत बेकायदेशीर कत्तलीसाठी नऊ जनावरे उपाशीपोटी व पाण्याविना शेडमध्ये निर्दयपणे बांधून ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान कुरेशी इब्राहिम कुरेशी (वय ३२) याला अटक केली आहे.
एप्रिल ३० रोजी पहाटे ४:२० ते ६:३० दरम्यान गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला. छाप्यात नऊ जिवंत जनावरे आढळून आली, जी योग्य देखभालीशिवाय शेडमध्ये बांधून ठेवण्यात आली होती. ही जनावरे कत्तलीसाठी ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी सळया, नायलॉन दोर आदी साहित्य जप्त केले असून त्याची एकूण किंमत सुमारे १.३५ लाख रुपये आहे. जनावरांची सुटका करून त्यांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहेत.
पोलीस कॉन्स्टेबल इम्रान शेख यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, १९७६ (सुधारित १९९५) अंतर्गत कलम ५, ५(ब), ९ आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंध अधिनियम, १९६० अंतर्गत कलम ११ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, अतिरिक्त आयुक्त निसार तांबोळी, उत्तर विभागाचे अपर आयुक्त प्रमोद शेलवे, उपायुक्त महांक स्वामी आणि सहाय्यक आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांच्या नेतृत्वात पोलिस अधिकारी रहमत शेख, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर भोळे, इम्रान शेख, रमेश मनेवार, गगन यादव, संतोष शेंद्रे व राहुल चिकाटे यांनी केली.