नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या PM गती शक्ती योजनेअंतर्गत, आणि केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर येथील सिंदी (वर्धा जवळ ) येथे उभारण्यात आलेल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP) ने आपल्या वाणिज्यिक कामकाजास सुरूवात केली आहे. या प्रकल्पाचा उद्देश वेगवान, सुसंगत व कार्यक्षम वाहतुकीस प्रोत्साहन देणे असून, शेवटच्या टप्प्याची जोडणी सुधारण्यावर भर आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) 100% मालकीच्या National Highway Logistics Management Limited (NHLML) या कंपनीमार्फत MMLP नागपूरची स्थापना करण्यात आली आहे. 28 एप्रिल रोजी येथे फरूखनगरहून 123 मारुती कार्सचा पहिला रेक दाखल झाला असून, हा टप्पा या प्रकल्पाच्या दृष्टीने एक मोठा मैलाचा दगड ठरला आहे.
MMLP हा प्रकल्प Public-Private Partnership (PPP) मॉडेलवर राबविण्यात येत असून, 150 एकर जागेवर तीन टप्प्यांत उभारला जाणार आहे. एकूण खर्च सुमारे 673 कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यासाठी 137 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
या प्रकल्पासाठी महाराष्ट्र MMLP प्रा. लि. नावाचे प्राधिकरण विशेष उद्देश कंपनी (SPV) स्थापन करण्यात आले आहे, जी NHLML व जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) यांच्यातील भागीदारी आहे. ही कंपनी जमीन, रस्ते व रेल्वे जोडणी, तसेच पाणी व वीज पुरवठा करण्याची जबाबदारी सांभाळणार आहे.
MMLP मध्ये गोदामे, कोल्ड स्टोरेज, इंटरमोडल ट्रान्सफर, कंटेनर हँडलिंग सुविधा, बल्क व ब्रेक-बल्क कार्गो टर्मिनल, तसेच मूल्यवर्धित सेवा जसे की सॉर्टिंग/ग्रेडिंग, बंधित गोदामे व कस्टम्स सुविधा, ट्रक टर्मिनल्स आणि मालवाहू कंपन्यांसाठी कार्यालये अशा सुविधा असतील.
हा प्रकल्प देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला बळकटी देईल, खर्च व वेळ कमी करेल, व ट्रॅकिंग प्रणाली सुधारेल.यामुळे रोजगार निर्मिती होणार असून, परिसराचा आर्थिक विकासही साधला जाईल.