Published On : Thu, Nov 14th, 2019

दीड लाखाचा सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत वाडी येथील एस. टी. सी. लॉजिस्टिकच्या ट्रान्‍सपोर्ट गॅरेजमध्ये 1 लाख 48 हजार 800 रुपये किंमतीचा 248 किलो वजनाचा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त करण्यात आली आहे.

एस.टी. सी. लॉजिस्टिक या ट्रांसपोर्ट गॅरेजमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा वाहतुकीसाठी साठविल्याने ते सिलबंद करण्यात आले आहे. या साठ्यातून नमुना विश्लेषणास्तव घेण्यात आला असून उर्वरित साठा अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींनुसार जप्त करुन अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जमा करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त शरद कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी ललित सोयाम तसेच महेश चहांदे, अरुण सौदे यांनी केली.

प्रशासनाच्या वतीने गुटखाबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा अशा पदार्थांचे उत्पादन, वितरण, विक्री होत असल्यास 0712-256224 या दूरध्वनी क्रमांकवर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त शरद कोलते यांनी केले आहे.