Published On : Thu, Nov 14th, 2019

गोवारी शहीद स्मारकावर येणाऱ्या समाज बांधवांसाठी सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवा – ठाकरे

Advertisement

23 नोव्हेंबर रोजी आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली दिवस, आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या पूर्व तयारीबाबत आढावा बैठक

नागपूर : झिरो माईल येथे येत्या 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजलीपर कार्यक्रमासाठी येणाऱ्या समाज बांधवांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात. तसेच या कार्यक्रमाला देशातील विविध भागातील रेल्‍वे, बसने संघटनेचे बिल्ले, बॅनर सोबत घेवून येणाऱ्या व जाणाऱ्या समाज बांधवांना सौजन्यपूर्वक वागणूक देण्याबाबतचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आदिवासी गोवारी शहीद श्रद्धांजली कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे, आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, सहसचिव रणवीर नेवारे, विदर्भ सचिव संजय हांडे तसेच सदस्य उपस्थित होते.

आदिवासी गोवारी शहीद समितीच्या बैठकीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे म्हणाले, येत्या 23 नोव्हेंबर रोजी झिरो माईल येथे आदिवासी गोवारी शहीद स्मारकाजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देशाभरातील आदिवासी गोवारी समाज बांधव उपस्थित राहतील. यावेळी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा प्राप्त करुन देण्यात याव्यात. शहीद स्मारकाच्या आतील भागात असलेले स्वच्छातागृह व शौचालयांची संख्या वाढविण्यात यावी. आगंतुकांसाठी पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच स्मारक परिसरात महानगरपालिकेतर्फे शहीद ज्योत सुरु ठेवावी. सकाळी 8 वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत कार्यक्रमस्थळी एक मोबाईल रुग्णवाहिका तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी. कार्यक्रमस्थळी शामियाना तसेच विद्युत व्यवस्था उभारण्यात यावी, अशा सूचना त्यांनी संबंधितांना यावेळी दिल्या.

स्मारक परिसरात ध्वनिक्षेपणाची संख्या वाढविण्यात यावी. यावर केवळ शहीद गीते तसेच महत्त्वाच्या सूचना देण्यात याव्यात. यावर कोणालाही भाषण देता येणार नाही. स्मारक परिसरात सकाळी चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा. तसेच येथील परिसर फुलझाडांनी सुशोभित करण्यात यावा. कार्यक्रमाला येणाऱ्या समाजबांधवांच्या वाहनांसाठी संबंधित विभागाने पार्किंगची चोख व्यवस्था करावी व त्याबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी यावेळी दिल्यात.