Published On : Tue, Jun 4th, 2019

कमी पटसंख्येअभावी कामठी तालुक्यातील 11 शाळा बंद होण्याच्या मार्गावर

कामठी: जिल्हा परोषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून कामठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची मूलभूत सेवा दिली जाते तसेच कामठी नगर परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नगर परिषद शाळेच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची सोय दिली जाते. खाजगी शाळेकडे पालकांचा वाढता कल लक्षात घेता जिल्हा परिषद शाळा तसेच नगर परिषद शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेश संख्येसह पटसंख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषद शाळेत डिजिटल सेवा सह विज्ञान केंद्राची सोय करण्यात आली आहे तरीसुद्धा विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीवर नसून उलट शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावली असल्याने पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी 2 मे रोजीच्या शासकीय आदेशानुसार वर्ग 1 ते 4 मध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा इतरत्र शाळेत समायोजन करण्याचे असल्याने कामठी तालुक्यातील 11 शाळा ह्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत ज्यामध्ये जिल्हा परिषद च्या 9 प्राथमिक शाळा तर नगर परोषद च्या 2 प्राथमिक शाळेचा समावेश आहे. तर या 11 शाळांना नजीकच्या 3 किमी च्या आतील शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांना होणारी ही डोकेदुखी लक्षात घेता विद्यार्थ्यांना प्रति महिना वाहतूक भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे.

यानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 11 शाळेचा विचार केला असता कामठी तालुक्यातील बिडगाव येथील जिजामाता नगर , तांदुळवाणी, कुसुंबी, राणमांगली, नांदा(जुना), बोरगाव, निंबा, येरखेडा( मरारटोली ), झरप या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच कामठी नगर परिषद च्या गौतम नगर स्थित नेहरू मराठी ब्रांच प्राथमिक शाळा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर हिंदी प्राथमिक शाळेचा समावेश आहे.

कामठी तालुक्यात एकूण 224 शाळा असून यामध्ये जिल्हा परिषद च्या 79, नगर परिषद च्या 17, खाजगी अनुदानित 53, खाजगी विना अनुदानित 73 तसेच छावणी परिषद च्या 2 शाळांचा समावेश आहे.जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश संख्येसह पालकांचा ही कल वाढावा या उद्देशाने कामठी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने शर्यतीचे प्रयत्न करतात यातून 33 जिल्हा परिषद शाळा ह्या डिजिटल करण्यात आल्या आहेत, शाळेच्या भिंती ह्या बोलक्या आहेत , तसेच महालगाव, भुगाव क्र 2 व बिना या तीन शाळेत प्रयोगशाळा विज्ञान केंद्र सुद्धा उघडण्यात आले आहेत .यानुसार यावर्षी च्या शैक्षणिक क्षेत्रासाठी पहिल्या वर्गासाठी 447 विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या नोंद आहे तर जी प शाळेच्या एकूण पटसंख्या ही 4300 आहे तर नगर परिषद शाळेची 1948 विद्यार्थी संख्या आहे .मात्र 1 ली ते 4 थ्या वर्गातील विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करून विद्यार्थी नजीकच्या शाळेत समायोजन करण्याचे आदेश धडकल्याने कामठी तालुक्यातील 11 शाळावर शाळा बंद होण्याची टांगती तलवार आहे.मात्र असे झाल्यास बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थी 3 किलोमीटर च्या आतील शाळेत विद्यार्थी तसेच शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार असले तरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास होणार आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना वाहतुक खर्च जरी देत असले तरी यामध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक मानसिकता बदलण्याच्या मार्गावर राहिल परिणामी विद्यार्थीचे प्रवेश हे खाजगी शाळेकडे वळणार आहे तेव्हा पटसंख्येअभावी शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी विद्यार्थी पालकवर्गानी केली आहे.

– संदीप कांबळे कामठी