Published On : Fri, Dec 7th, 2018

जागतिक मतिमंद दिनानिमित्त मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि स्वीकार मतिमंद मुलांच्या पालकांची संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मतिमंद दिनानिमित्त मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन आज शनिवार ८ डिसेंबर २०१८ रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह येथे सकाळी ८.३० ते ४ या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.मतिमंद मुलांचे भवितव्य सावरण्याचा एक प्रयत्न असे या कार्यक्रमाचे नाव आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता महापौर नंदा जिचकार व दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी आयुक्त अभिजित बांगर, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, अतिरिक्त आयुक्त अझिझ शेख, परसिस्टंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयराज सरमुकदम, स्वीकार संस्थेच्या अध्यक्षा चित्रा कामथ, प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्राजक्ता कडुस्कर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या सत्रात व्यवसाय किंवा नोकरी करणा-या मतिमंद मुलांच्या यशोगाथांची चित्रफित व सत्कार सोहळा, दुस-या सत्रात मतिमंद मुलांच्या पालकांशी संवाद त्यांची अपेक्षा, त्यांचे प्रयत्न यावर डॉ.प्राजक्ता कडुस्कर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

तिस-या सत्रात मतिमंद मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुपारी चार वाजता या स्नेहमिलनाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला शहरातील सर्व मतिमंद शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपायुक्त रंजना लाडे व स्वीकार संस्थेचे सचिव माधव दामले यांनी केले आहे.