Published On : Fri, Dec 7th, 2018

गोवर रूबेला लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची

नागपूर: गोवर रूबेला लसीकरण मोहिमेला २७ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. ही लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी महापालिकेतील शिक्षकांची भूमिका मह्त्त्वाची आहे, असे प्रतिपादन डब्लूएचओचे प्रतिनिधी डॉ.मोहम्मद साजिद यांनी व्यक्त केले. शुक्रवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात महापालिकेतील शाळांमधील शिक्षकांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते.

यावेळी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, डॉ.नरेंद्र बहिरवार, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ.सोनाली डहाके यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ,साजिद म्हणाले, गोवर रूबेला ही लसीकरण मोहिम पूर्णपणे यशस्वी करणे गरजेचे आहे. नागपुरात ही लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. आतापर्यंत १ लाख ५५ हजार मुलामुलींना ही लस देण्यात आली आहे. यामध्ये मुख्यत्वे सर्व शासकीय व खासगी शाळा, बालकाश्रम, अनाथाश्रम, मदरसे, बालसुधारगृह, केंद्रीय विद्यालये यामध्ये ही लस देण्यात आली आहे.

यापूर्वीही ही लस खासगी व सरकारी दवाखान्यांमार्फत देण्यात येत असे. परंतु त्यात असे दिसून आले की, अनेक बालके या लसीपासून वंचित राहत असत. त्यामुळे एकही बालक यापासून वंचित राहू नये याकरिता ही लसीकरण मोहीम शासनाने हाती घेतली आहे. गोवर रूबेला सारख्या आजाराचे समुळ नष्ट करण्यासाठी ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविणे आवश्यक आहे, असे डॉ.साजिद यांनी प्रतिपादित केले.

राज्यात सर्वत्र ही लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. ९ महिन्याचे बाळ ते १५ वर्षाखालील मुला मुलींना ही लस देणे अनिवार्य आहे. यावेळी महापालिकेतील उर्दू शाळेतील शिक्षिका व समाजकल्याण विभागातील महिला कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.