Published On : Tue, Oct 5th, 2021

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन महापौरांनी केले स्वागत

कोव्हिड-१९ संदर्भातील नियमांचे पालन करीत मनपाच्या शाळा सुरु

नागपूर : कोरोना महामारीमुळे बंद असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या शाळांची घंटा सोमवारी (ता.४) रोजी वाजली. शाळेच्या पहिल्या दिवशी मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सोमवारी (ता. ४) हनुमाननगर येथील लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, मनपा शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक संजय पुंड आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले की, कोरोना काळात सर्वात जास्त नुकसान शिक्षण क्षेत्राचे तसेच विद्यार्थ्यांचे झाले आहे. मात्र या काळात त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून मनपाच्या शाळेतील शिक्षकांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग घेतले. ज्या मुलांना ऑनलाईन शिक्षण शक्य नाही, अशा मुलांना त्याच्या घरी जाऊन शिकविण्यात आले. याचाच परिणाम असा की, यावर्षी मनपा शाळेतील पटसंख्या वाढली आहे. हे शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे, असे म्हणत महापौरांनी त्यांचे कौतुक केले. यावर्षी लालबहादूर शास्त्री इंग्रजी शाळेत वर्ग १ ते ४ मध्ये ७० विद्यार्थी आणि वर्ग ५ ते १० मध्ये ११५ विद्यार्थी वाढले असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, शिक्षक विद्यार्थ्यांचे नाते अतूट आहे. परस्पर संवादातून विद्यार्थी आपल्या मनातील अनेक प्रश्न विचारून शंकांचे निरसन करू शकतात. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील कमतरता आता शिक्षकांनी भरून काढावी आणि दहावीचा शतप्रतिशत निकाल देण्यासाठी शिक्षकांनी योग्य नियोजन करावे, असेही ते म्हणाले. तसेच महापौरांनी यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष चांगले जावे यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी शाळा सुरु झाल्याचा आनंद व्यक्त केला. संचालन शिक्षिका मधू तिवारी यांनी तर आभार प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता येवले यांनी मानले.

दहावीच्या शंभर टक्के निकालाचे उद्दिष्ट : प्रा. दिलीप दिवे
शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, यावर्षी मनपा शाळेतील दहावीचे निकाल शंभर टक्के देण्याचे उद्दिष्ट आहे. याअनुषंगाने मनपाचे शिक्षण विभाग नियोजन करीत आहे, असे ते म्हणाले. तसेच मुंबई वगळता विद्यार्थ्यांना ई-टॅबलेट देणारी राज्यातील एकमेव नागपूर महानगरपालिका आहे. सोबतच इंटरनेटची व्यवस्था सुद्धा करून देत आहे. यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी येणाऱ्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर पुरेपूर लक्ष द्यावे, असे आवाहन यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.